- rat३p३.jpg-
P26O35090
कोकण रेल्वे
-----
सेवा-सुरक्षेत कोकण रेल्वे आघाडीवर
वर्षभरात १ हजार ४०० विशेष गाड्या; सण-उत्सवात प्रवाशांची सोय, मालवाहतुकीत वाढ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, प्रवासी सुरक्षेला दिलेले प्राधान्य आणि महसूलवाढीच्या जोरावर कोकण रेल्वे कॉर्पोरेशनने (केआरसीएल) गेल्या वर्षभरात कनेक्टिव्हिटी, सुरक्षा आणि सेवेचे नवे टप्पे गाठले आहेत. कोकण रेल्वेच्या या प्रगतीचा थेट लाभ कोकणातील चाकरमान्यांना झाला असून, सण-उत्सवांसह उन्हाळी सुटीत प्रवाशांच्या सोयीसाठी वर्षभरात तब्बल १,४०० विशेष गाड्या चालवत रेल्वेने प्रवाशांचा प्रवास सुखकर केला आहे.
‘विकसित भारत’च्या स्वप्नाला साकार करण्याच्या दिशेने वाटचाल करत कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे (KRCL) उत्कृष्ट सेवा, नावीन्य आणि विकासाचे एक महत्त्वपूर्ण वर्ष पूर्ण केले आहे. कोकण रेल्वेने आपल्या कार्यक्षेत्रात कनेक्टिव्हिटी वाढवताना सुरक्षा आणि शाश्वत विकासावर भर देत आर्थिक प्रगती आणि राष्ट्रीय एकात्मतेमध्ये मोलाचे योगदान दिले आहे. या यशाबद्दल कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी सांगितले, पंतप्रधानांच्या ‘सबका साथ, सबका विकास’ या ध्येयानुसार आम्ही जागतिक दर्जाच्या रेल्वे पायाभूत सुविधा उभारण्यास वचनबद्ध आहोत.
गेल्या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेने परिचालन आणि महसूल क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. प्रवासी वाहतुकीत लक्षणीय वाढ नोंदवण्यासोबतच रेल्वेने सर्वाधिक २७.५९ कोटी रुपयांचा तिकीट तपासणी महसूल गोळा करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे. तसेच, ‘देवदर्शन’ विशेष गाड्यांसह ६ एफटीआर सेवांच्या माध्यमातून रंजनगाव, अयोध्या आणि रामेश्वरमसारख्या तीर्थक्षेत्रांना जोडले आहे. पायाभूत सुविधांचा विचार करता युएसबीआरएल प्रकल्पाच्या पूर्णत्वात रेल्वेने महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, कठोर भौगोलिक परिस्थितीमध्ये सुरक्षितता वाढवण्यासाठी पूल, बोगदे आणि सिग्नलिंग प्रणालीचे आधुनिकीकरण केले आहे. याशिवाय, रो-रो सेवांची क्षमता ५० मेट्रिक टनांवरून ५७ मेट्रिक टनांपर्यंत वाढवून मालवाहतुकीत कार्यक्षमता आणली आहे. देखभालीसाठी प्रथमच ड्रोनद्वारे ट्रॅक देखरेखीचे आधुनिक तंत्रज्ञान अवलंबले गेल्याने कामाचा वेळही वाचला आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी गेल्या वर्षभरात एकूण १,४०० विशेष गाड्या चालवण्यात आल्या, ज्यात प्रामुख्याने गणपती, उन्हाळी आणि हिवाळी विशेष गाड्यांचा समावेश होता. दिव्यांग प्रवाशांसाठी करमाळी, थिवी, कारवार, मुरूडेश्वर आणि उडुपी स्थानकांवर रॅम्प, ब्रेल लिपीतील फलक आणि सुधारित दिशादर्शक लावले आहेत. तसेच १० प्रमुख स्थानकांवर वातानुकूलित रूम आणि ‘डिजी लॉकर’ची सोय करण्यात आली आहे.
---
तंत्रज्ञानाचा असाही वापर
तंत्रज्ञान आणि सुरक्षिततेच्या आघाडीवरही कोकण रेल्वेने मोठी मजल मारली आहे. सौरऊर्जेच्या वापराद्वारे ३.६७ लाख किलोवॅट-तास वीजनिर्मिती करून सुमारे ४५.९४ लाख रुपयांची बचत केली आहे. सुरक्षाव्यवस्थेने चोरीच्या ९२ प्रकरणांमध्ये ३५.७३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर रेल्वे प्रवासादरम्यान हरवलेल्या ९० बालकांना सुखरूप त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवून सामाजिक जबाबदारी पार पाडली. प्राण्यांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी कारवार आणि रत्नागिरी विभागात २,७०० मीटरचे ‘कॅटल रन-ओव्हर’ प्रतिबंधक कुंपण उभारले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.