जुनं ते सोनं----------लोगो
धडा टंचाईचा अन् आयुष्याचाही
युद्धजन्य परिस्थिती, पुरवठ्यातील अडथळे आणि वाढती टंचाई, या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर आजचे शहरी जीवन किती नाजूक आहे, हे प्रकर्षाने जाणवू लागले आहे. रोजच्या गरजेच्या वस्तू-इंधन, अन्न, पाणी या सहज उपलब्ध असतात, ही सवय झाली आहे; पण या गोष्टी वेळ पडेल तेव्हा मिळतीलच याची खात्री नाही. गॅसटंचाईचे संकट याचेच ठळक उदाहरण आहे. अशा वेळी एकेकाळी कालबाह्य मानले गेलेले केरोसीनवर चालणारे स्टोव्ह पुन्हा केंद्रस्थानी आले आहेत.
- धनंजय मराठे, राजापूर
----
वयोवृद्ध जैनुद्दीन महमद सय्यद उर्फ ‘सय्यद चाचा’ यांना अनेक वर्षांपूर्वी स्टोव्ह, बत्त्या, कलई, रेडिओ सेल-बॅटरी दुरूस्ती करताना पाहिले होते; मात्र गेली दहा वर्षे ते या कामापासून दूर गेले होते. आता ते फक्त सवय म्हणून, वेळ जावा म्हणून दुकानात बसत असत; पण आज चित्र पूर्णपणे बदललेले होते.
गप्पा मारणारे चाचा आज कामात गर्क होते. इतके की, त्यांच्या छोट्याशा दुकानात स्टोव्ह दुरुस्तीसाठी लोकांना नंबर लावावा लागत होता. हे काम ते पैशासाठी करत नव्हते तर त्यांच्या हातच्या कलेचा आज पुन्हा समाजाला आणि अडचणीत सापडलेल्या व्यवसायांना होणारा उपयोग पाहून ते कामात रमले होते. वयोमानामुळे आता पूर्वीसारखे काम झेपत नसले, स्पेअरपार्ट्स सहज मिळत नसले तरीही त्यांनी जपून ठेवलेल्या जुन्या साठ्यातून ते येणाऱ्यांचे काम शक्य तितके पूर्ण करत होते. गॅसच्या योजना, आधुनिक उपकरणे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे हे स्टोव्ह जवळजवळ इतिहासजमा झाले होते. नवीन स्टोव्ह बाजारात सहज उपलब्ध नाहीत; मात्र आज घराच्या कोपऱ्यात पडलेले, धुळीत झाकलेले तेच जुने स्टोव्ह पुन्हा बाहेर काढले जात आहेत. त्यांच्या दुरुस्ती आणि सर्व्हिसिंगसाठी मागणी वाढत आहे आणि त्याचबरोबर पुन्हा जिवंत झाला आहे स्टोव्ह रिपेअरिंगचा जुना व्यवसाय.
नोझल साफ करणे, गॅस्केट बदलणे, पंप दुरुस्त करणे ही एकेकाळी सामान्य वाटणारी कामे आज पुन्हा अत्यावश्यक बनली आहेत. या सगळ्यातून एक महत्त्वाचा धडा स्पष्टपणे समोर येतो. कोणताही व्यवसाय कधीच कालबाह्य होत नाही; तो केवळ योग्य वेळेची वाट पाहत असतो. याच संदर्भात शहरी आणि ग्रामीण जीवनातील तफावतही अधोरेखित होते. शहरात सुविधा विपुल असतात; पण त्या पूर्णतः बाह्ययंत्रणांवर अवलंबून असतात. गॅसपुरवठा खंडित झाला, पाणी उपलब्ध झाले नाही, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण झाला तर शहरातील माणूस असहाय्य ठरतो. याउलट, ग्रामीण जीवनात स्वावलंबनाची परंपरा आजही जिवंत आहे. गॅस नसेल तर चूल मांडता येते. पाणी नसेल तर विहीर, ओढा किंवा स्थानिक स्रोत उपयोगात आणता येतो. परसात जागा असेल तर भाजीपाला उगवता येतो. म्हणजेच, संकटकाळात गावातील माणूस स्वतःच्या कष्टावर जीवन सुसह्य करू शकतो. कोरोनासारख्या महामारीत हे वास्तव अनुभवायला मिळाले.
गावाकडचं जीवन साधं असलं तरी ते टिकाऊ आहे. निसर्गाशी असलेलं नातं, श्रमांची तयारी या गुणांमुळे गाव संकटातही तग धरून राहतं. जुनी साधने, जुने व्यवसाय आणि सय्यद चाचांसारखे कारागीर हे केवळ भूतकाळाचे अवशेष नाहीत तर ते भविष्यासाठीही तितकेच आवश्यक आहेत. या सगळ्या अनुभवातून मनातून उमटणारा निष्कर्ष एकच ‘जुने ते सोने… आणि गड्या आपला गाव बरा!’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.