शिवसेनेच्या मोर्चाला
मच्छीमारांचा पाठिंबा
मालवण : अनधिकृत एलईडी लाईट मासेमारी आणि डिझेल दरवाढी विरोधात ठाकरे शिवसेनेतर्फे शुक्रवारी (ता. १०) मत्स्य विभागावर काढण्यात येणाऱ्या भव्य मोर्चाला श्रमिक मच्छीमार संघ, श्रमजिवी रापण संघटना आणि महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती या मच्छीमार संघटनांनी पाठिंबा जाहीर केला आहे. एलईडीसारख्या अतिरेकी व बेकायदा मच्छिमारीमुळे समुद्रातील मत्स्य संपत्तीचे व जैवविविधतेचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे पारंपरिक व लहान मच्छीमारांना मासळी मिळेनाशी झाली असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या विरोधात आम्ही सातत्याने लढा देत असून ठाकरे शिवसेनेतर्फे काढण्यात येणाऱ्या मोर्चाला आमचा पाठिंबा आहे. पारंपरिक मच्छीमारांच्या हितासाठी काढण्यात येणाऱ्या कोणत्याही मोर्चाला आमचा पाठिंबाच असेल, असे मच्छीमार संघटनांच्या नेत्यांनी म्हटले आहे. या मोर्चात जास्तीत जास्त मच्छिमारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्रमिक मच्छीमार संघाचे अध्यक्ष छोटू सावजी, श्रमजिवी रापण संघटना अध्यक्ष दिलीप घारे, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांनी केले आहे.
...................
मळेवाड येथे आज
दशावतारी नाटक
आरोंदाः मळेवाड राणेवाडी येथील श्री ब्राह्मणदेव मंदिर वर्धापन दिन उद्या (ता. ९) आयोजित केला आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता पूजा व अभिषेक, १०.३० वाजता श्री सत्यनारायण महापूजा व कथा वाचन, दुपारी १२.३० वाजता महाआरती आणि तीर्थप्रसाद, १ पासून महाप्रसाद, रात्री ९ वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री ब्राह्मणदेव प्रासादिक कला, क्रीडा मंडळ व ग्रामस्थ यांनी केले आहे.
...................
चित्र प्रदर्शनाला
केरवडेत प्रतिसाद
माणगाव ः माणगाव खोऱ्यातील महादेवाचे केरवडे येथील सिद्धमहादेव मंदिरानजीक (भास्कर केरवडेकर यांच्या घराच्या प्रांगणात) प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वस्तरीय विश्वविद्यालय (कुडाळ) यांच्या वतीने शिव व शंकरमधील भेद दर्शविणारे चित्रप्रदर्शन व त्यावर माहिती दर्शविणारी चित्रे मांडण्यात आली आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर यांच्या हस्ते करण्यात आले. बी. के. कांचन दीदी, हर्षा दीदी व भास्कर केरवडेकर तसेच केरवडे ग्रामस्थ उपस्थित होते. भक्तांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वस्तरीय विश्वविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
.......................
मालवणात उद्या
रक्तदान शिबिर
मालवण ः धक्का मित्रमंडळ, मालवणतर्फे शुक्रवारी (ता. १०) सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. अपघातग्रस्त रुग्ण, गरोदर महिला, थॅलेसिमिया, कॅन्सर, डायलिसिस रुग्ण तसेच विविध शस्त्रक्रियांसाठी रक्ताची अत्यंत आवश्यकता असते. सध्या रक्तसाठा कमी असल्याने सुदृढ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदानासाठी पुढे यावे. रक्तदानासाठी येताना नागरिकांनी आपल्या मित्रपरिवारालाही सोबत आणावे, ज्यांना शिबिरस्थळी येण्या-जाण्याची सोय उपलब्ध नाही, त्यांनी आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी बाबू डायस, नितीन कोटियान, स्वप्नील कदम, नीतेश जाधव, रोहित चव्हाण, शुभम तोडणकर, शैलेश मलये, भूषण पिसे, विजय पांचाळ, अनिकेत चव्हाण, हेमंत शिरगावकर, विशाल आपकर, देवदत्त तोडणकर, गौरेश कांबळी, राहुल केळुस्कर, प्रणव गावकर, गुणेश हडकर, महेंद्र पारकर, प्रतीक कुबल यांच्याशी संपर्क साधावा.
.......................
ओटवणेत शनिवारी
धार्मिक कार्यक्रम
ओटवणे ः खासकिलवाडा-गोठण येथील श्री देव महापुरुष देवस्थान उत्सवानिमित्त शनिवारी (ता. ११) दुपारी श्री सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, रात्री ८ वाजता भजने, १० वाजता जय हनुमान पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ (आरोस) यांचा ''दख्खनचा राजा जोतिबा माझा'' हा नाट्यप्रयोग होणार आहे.
.......................
सातार्ड्यात आज
जिव्हेश्वर नाटक
सावंतवाडी ः सातार्डा वरचावाडा येथील श्री देव राष्ट्रोळी नाट्य रंगमंच येथे उद्या (ता. ९) सायंकाळी ७ वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्य मंडळाचा ''जिव्हेश्वर'' हा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग होणार आहे. नाट्यरसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गोवेकर बंधू व वरचावाडा ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.