36697
सावंतवाडी ः नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांनी येथील मच्छी मार्केटची पाहणी केली.
मच्छीमार्केटप्रश्नी लवकरच तोडगा
श्रद्धा भोसले; सावंतवाडीत सुविधांची पाहणी, अधिकाऱ्यांना सूचना
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ११ ः येथील नगरपालिकेच्या मच्छी मार्केटमध्ये काही दिवसांपासून निर्माण झालेल्या दुरवस्थेबाबत नागरिकांनी आणि मच्छी विक्रेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. या तक्रारींची दखल घेत नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांनी आज प्रत्यक्ष मार्केटला भेट देऊन पाहणी केली. ‘येत्या काही दिवसांत यावर कायमस्वरुपी आणि ठोस तोडगा काढला जाईल,’ असे आश्वासन नगराध्यक्ष श्रीमती भोसले यांनी दिले.
यावेळी मार्केटमधील भीषण वास्तव समोर आले असून, विक्रेत्यांनी आपल्या दैनंदिन अडचणी आणि प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत नगराध्यक्षांकडे गाऱ्हाणे मांडले. विशेषतः पावसाळ्यात होणारा त्रास, सांडपाण्याचा निचरा न होणे, गटारावरील तुटलेल्या जाळ्या आणि स्वच्छतेचा अभाव यांमुळे विक्रेत्यांसह ग्राहकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे यावेळी दिसून आले.
मार्केटमधील अपुऱ्या सुविधा आणि आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता, नगराध्यक्षांनी उपस्थित अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या. मार्केटची दररोज स्वच्छता करणे, सांडपाण्याच्या निचऱ्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आणि नवीन कचराकुंडी बसवण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच विक्रेत्यांना बसण्यासाठी योग्य आसनव्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. ही सर्व परिस्थिती हाताळणे ही प्रशासनाची जबाबदारी असून येत्या काही दिवसांत यावर कायमस्वरुपी आणि ठोस तोडगा काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी मच्छी विक्रेत्यांना दिले.
---
कामात हलगर्जीपणा नको!
या पाहणी दौऱ्यादरम्यान नगराध्यक्षांनी संबंधित विभागाला तातडीने कामाला सुरुवात करण्याचे निर्देश दिले असून कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी नगरपालिकेचे गोविंद गवंडे, विनोद सावंत, मनोज राऊळ, रिझवान शेख यांच्यासह कर्मचारी आणि मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते. नगराध्यक्षांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे मार्केटमधील प्रलंबित प्रश्न आता लवकरच सुटतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.