- rat१३p५.jpg-
P26O37012
राजापूर ः आमदार किरण सामंत यांना निवेदन देताना तळवडे सरपंच गायत्री साळवी यांच्यासमवेत उमेश शिंदे, आप्पा साळवी, सुनील गुरव, शैलेश साळवी, ग्रामपंचायत अधिकारी मंगेश जाधव आदी.
तळवडे बनणार ‘मधाचे गाव’
पर्यटनासह रोजगाराला चालना; आंबा, काजू उत्पादनात वाढ
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. १३ ः राजापूर तालुक्यातील तळवडे गावाला आता जागतिक नकाशावर नवी ओळख मिळणार आहे. पश्चिम घाटातील समृद्ध वनसंपदेचा वारसा लाभलेल्या या गावाची शासनाकडून ‘मधाचे गाव’ म्हणून निवड करण्यात आली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे ५४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, यामुळे शेती, फलोत्पादन आणि पर्यटनासह स्थानिक रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.
तळवडे गावच्या या निवडीमध्ये पालकमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि पितांबरी उद्योगसमूहाचे प्रमुख रवींद्र प्रभुदेसाई यांची भूमिका महत्त्वाची आहे. सरपंच गायत्री साळवी यांनी नुकतीच आमदार किरण सामंत यांची भेट घेऊन प्रकल्पाच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा केली. या वेळी ग्रामपंचायत तळवडे, पितांबरी समूह आणि सुगंधी व समृद्ध कोकण विकासमंच यांच्या संयुक्त विद्यमाने राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली. तळवडे आणि गुरववाडी अशा दोन महसूल गावांमध्ये विस्तारलेल्या या गावाची लोकसंख्या २ हजार ८०० असून, धरणाच्या पाण्यामुळे येथे बारमाही शेती शक्य आहे. मधमाशांच्या संवर्धनामुळे परागीभवन वाढून फलोत्पादनात आंबा, काजू उत्पादनात २० ते ३० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. ‘हा प्रकल्प केवळ मधापुरता मर्यादित नसून, पर्यटनाच्या माध्यमातून गावविकासाला गती देणारा ठरेल,’ असा विश्वास सरपंच साळवी यांनी व्यक्त केला.
दरम्यान, सरपंच गायत्री साळवी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आमदार किरण सामंत यांना निवेदन देऊन प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय सहकार्याची मागणी केली. या वेळी उमेश शिंदे, आप्पा साळवी, सुनील गुरव, शैलेश साळवी, ग्रामपंचायत अधिकारी मंगेश जाधव उपस्थित होते. आमदारांनी या प्रकल्पासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
------
तळवडे गाव
* क्षेत्रफळ: १९९५.३३ हेक्टर
* लोकसंख्या: २,८००
* मुख्य पिके: भात, नाचणी आणि फलोत्पादन
* पाणीपुरवठा: धरणामुळे बारमाही पाण्याची उपलब्धता
------
असे असेल मधाचे गाव
* गावात प्रवेश करतानाच कमान आणि माहितीफलक
* जंगलात आणि वस्तीनजीकच्या शास्त्रीय पद्धतीने मधपेट्यांची मांडणी
* मधसंकलन, वर्गीकरण आणि पॅकेजिंगसाठी आधुनिक सुविधा
* शुद्ध मधविक्रीसाठी स्वतंत्र दालन
* स्थानिकांना मधमाशी पालनाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण
* मधाचे संकलन पाहण्यासोबतच चित्रसंग्रहालय आणि ‘सेल्फी पॉईंट’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.