देवरूख वाचनालयात
उद्यापासून व्याख्याने
साखरपा : देवरूख येथील श्री सद्गुरू लोकमान्य वाचनालय येथे धनंजय चितळे यांच्या तीन व्याख्यानांचे आयोजन केले आहे. १५ ते १७ एप्रिलदरम्यान हे सत्र होणार आहे. वाचनालयाचे पहिले अध्यक्ष उद्धवराव जोशी यांच्या स्मरणार्थ व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. १५ एप्रिलला अपरांत भूमी निर्माता- भगवान श्री परशुराम, १६ ला संतवाङ्मयातील पर्यावरण विचार आणि १७ ला संतवाङ्मयातून व्यक्तिमत्व विकास या विषयावर व्याख्याने होणार आहेत. ही व्याख्याने सायंकाळी ५ वाजता होतील. व्याख्यानमाले दरम्यान उत्तम, ज्येष्ठ, नियमित लेखकांचा, वाचकांचा सन्मान केला जाणार आहे.
-------
देवरूखात उद्या
राष्ट्रवादीची बैठक
देवरूख ः रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची महत्त्वाची जिल्हा आढावा बैठक १५ एप्रिलला देवरूख येथे होणार आहे. सकाळी ११ वा. मराठा भवन येथे बैठक होणार आहे. जिल्ह्यातील पक्षीय संघटनात्मक बांधणी आणि आगामी रणनीतीवर यात प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे. रत्नागिरी जिल्हा निरीक्षक विजयराव देसाई यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील पक्षीय कामकाजाचा आढावा घेतला जाईल. आगामी काळातील पक्षाची ध्येयधोरणे आणि कार्यकर्त्यांची सक्रियता वाढवण्यासाठी देसाई यांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बने यांनी या बैठकीचे नियोजन केले असून, त्यांनी सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
-----------
दाऊद जबले यांचा
एकमेव अर्ज दाखल
चिपळूण ः तालुक्यातील कालुस्ते खुर्द-मजरेकाशी ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी प्रभाग क्र. २ मधून भाजपचे अन्वर जबले यांचे सुपुत्र दाऊद अन्वर जबले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत या प्रभागातून दाऊद जबले यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. सध्या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका सुरू आहेत. कालुस्तेखुर्द येथेही प्रभाग क्र. २ मध्ये पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. या जागेसाठी दाऊद जबले यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल आहे. येथे निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद केळसकर काम पाहत आहेत.
---------