37090
कृष्णा लाड यांना राष्ट्रीय
दशावतार कलाकार पुरस्कार
आरोंदा, ता. १३ : गोव्यातील कला व संस्कृती भवन (सेंट्रल लायब्ररी) येथे झालेल्या राष्ट्रीय लोकगौरव सन्मान परिषदेत आकेरी–हुमरस येथील युवा दशावतार कलाकार कृष्णा उर्फ साहिल शंकर लाड यांना राष्ट्रीय दशावतार कलाकार पुरस्कार प्रदान करण्यात आला.
आर्ट्स, टुरिझम अॅण्ड कल्चर फेस्टिव्हल समिती, गोवा तसेच नागेश महारुद्र फाउंडेशन, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद झाली. यात कला, संस्कृती आणि समाजसेवा क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. दशावतार या पारंपरिक लोककलेच्या जतन, संवर्धन व प्रचारासाठी तसेच समाजहितासाठी केलेल्या निष्ठावंत, सातत्यपूर्ण आणि प्रेरणादायी कार्याची दखल घेत कृष्णा लाड यांना मान्यवरांच्या हस्ते हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
लाड यांनी दशावतार नाट्यकलेची सुरुवात इयत्ता चौथीमध्ये शालेय स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून केली. लहान वयातच या कलेविषयी विशेष रुची दाखवत त्यांनी सातत्यपूर्ण मेहनत, साधना आणि प्रयोगशीलतेतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनयासोबतच गायन आणि संवादफेकीतील नेमकेपणा ही त्यांच्या भूमिकेची खास ओळख ठरली असून, प्रत्येक प्रयोगात ते प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतात. त्यामुळे दशावतार रंगभूमीवर नारदाची भूमिका म्हटली की कृष्णा लाड यांचे नाव आवर्जून घेतले जाते. पुरस्कारबाबत बोलताना लाड म्हणाले, दशावतार क्षेत्रात आतापर्यंत केलेल्या कार्याची पुरस्काराच्या माध्यमातून मिळालेली ही पोचपावती अत्यंत आनंददायी आहे. या सन्मानामुळे मनात नवचैतन्य निर्माण झाले आहे. हा पुरस्कार केवळ सन्मान न राहता, पुढील काळात दशावतार ही पारंपरिक लोककला अधिक जोमाने जपण्यासाठी, जोपासण्यासाठी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी मोठे प्रेरणास्थान ठरणार आहे. असे लाड यांनी पुरस्काराबाबत बोलताना सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.