37368
बांद्यात ‘शिव शिव सांब सदाशिव’चा जयघोष
धार्मिक कार्यक्रम; बांदेश्वर मंदिर कलशारोहणाचा वर्धापन दिन
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १४ : येथील प्रसिद्ध व जागृत स्वयंभू श्री देव बांदेश्वर मंदिर कलशारोहणाच्या दहाव्या वर्धापन दिन सोहळ्याला
हजारो भाविक भक्तांनी उपस्थिती दर्शविली. ‘शिव शिव सांब सदाशिव... हर हर हर हर सांब सदाशिव’ या जयघोषाने मंदिर परिसर चैतन्य व उत्साहाने भरून गेला.
या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. मंदिरात आकर्षक फुलांची सजावट, नेत्रदीपक रोषणाई तसेच तोरणे, कमानी व मंडप उभारण्यात आले होते. पूर्वसंध्येला सोमवार असल्याने रात्री साप्ताहिक सवाद्य पालखी सोहळा झाला. मंगळवारी वर्धापन दिन कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ८ वाजता गणपती पूजन, देवतांना नारळ विडे अर्पण करून सामुदायिक गाऱ्हाणे घालून करण्यात आली. त्यानंतर सकाळी ब्रम्हावृंदाकरवी श्री देव बांदेश्वर मंदिरात रूद्र अभिषेक, श्री देवी भूमिकेच्या मंदिरात श्री सुक्त आवर्तन, तसेच श्री गणेश मंदिरात गणपती अथर्वशीर्ष आवर्तन जप करण्यात आला. दुपारी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती आरती झाली व सर्वांच्या कल्याणासाठी गाऱ्हाणे घातले. त्यानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी स्थानिक मंडळांची भजने, त्यानंतर गुरुवर्य कै. दिगंबर गाड संस्थापित श्री देव बांदेश्वर संगीत कला वर्ग, बांदा यांच्या वतीने गुरुवर्य गुरुदास गांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभंग, नाट्यगीत व भावगीतांचा विशेष गायन कार्यक्रम तसेच रात्री उत्सवानिमित्त श्रींच्या विशेष सवाद्य पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. श्री देव बांदेश्वर भूमिका देवस्थान तसेच सर्व सेवेकरी भाविक भक्तमंडळी आपापली सेवा भक्तीभावाने करून या सोहळ्याच्या यशस्वी कार्यपूर्तीसाठी परिश्रम करताना दिसत होती. या वर्धापन दिन सोहळ्याचे औचित्य साधून १५ रोजी रात्री ९ वाजता प्रा. वसंत कानेटकर लिखित आणि दुर्वांकूर प्रॉडक्शन दोडामार्ग-सिंधुदुर्ग निर्मित अजरामर ऐतिहासिक नाटक ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ सादर केले जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.