37604
सावंतवाडीचे बसस्थानक दोन वर्षांत
आमदार दीपक केसरकर : विमानतळ धर्तीवर अद्ययावत रचना
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १५ : येथील रेंगाळलेले एसटी बसस्थानकाचे काम बीओटी तत्त्वावर लवकरच हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी येत्या दोन महिन्यांत आराखडा तयार करून टेंडर प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वांत मोठे एसटी बसस्थानक असल्याने ते विमानतळाच्या धर्तीवर अद्ययावत असेल. पुढील दोन वर्षांत हे बसस्थानक उभारण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी आज दिली.
श्री. केसरकर यांनी आज एसटी बसस्थानक परिसराची पाहणी केली. यावेळी स्थानकाचा आराखडा तयार करणारे हापीस कॉन्ट्रॅक्टर यांचे जवळचे हुजेफा भोल, एसटीचे विभागीय अभियंता अक्षय केंकरे, नगरपालिका मुख्याधिकारी विनायक औंधकर, पालिकेचे बांधकाम अभियंता तुषार सरडे, आगार व्यवस्थापक नीलेश गावित आदी उपस्थित होते. श्री. केसरकर म्हणाले, सावंतवाडी एसटी डेपोचे नव्याने सुरू केलेले काम कोरोना काळात रेंगाळले होते. हा विषय आपण राज्याचे परिवहन मंत्री यांच्या कानावर घालून हे एसटी स्टॅण्ड बीओटी तत्त्वावर अद्ययावत असे उभारण्यात यावे, अशी मागणी केली होती. या मागणीनुसार बसस्थानकाचा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. येथे दोन महिन्यांत हा आराखडा तयार करून बसस्थानकाच्या नवीन कामाचे टेंडर निघणार आहे. त्यानंतर पुढील दोन वर्षांत हे बसस्थानक कसे उभे राहील, यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. मात्र, बसस्थानक अद्ययावत असे उभारत असताना कोणीही विस्थापित होता कामा नये, याची आम्ही खबरदारी घेणार आहोत.
वेंगुर्ले बसस्थानक आणि सावंतवाडी बसस्थानकामध्ये पशुवैद्यकीय दवाखान्याचा अडथळा निर्माण होत आहे. मात्र, हा दवाखाना दुसरीकडे हलवण्यासंदर्भात बोलणे सुरू आहे. लवकरच याबाबत एसटीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाणार आहे. एकूणच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी एसटी स्टॅण्ड हे मोठे असल्याने विमानतळाच्या धर्तीवर याचा कायापालट केला जाणार आहे, असेही केसरकर म्हणाले.
श्री. केसरकर पुढे म्हणाले, बसस्थानकाचा जुना आराखडा बदलण्यात येणार आहे. यानुसार उभारलेली डेपोची इमारत तशीच ठेवून अन्य ठिकाणी नव्या आराखड्यानुसार काम होणार आहे. एकूण शंभर वर्षांचा करार करण्यात येणार असून, साधारण चार एकरमध्ये हे बसस्थानक उभे राहणार आहे. यामध्ये चार्जिंग स्टेशन तसेच अन्य विविध गोष्टी समाविष्ट आहेत. कमर्शियल बाबींचा विचार करता त्याठिकाणी दुकान गाळेसुद्धा समाविष्ट आहेत.
---------
‘मल्टिस्पेशालिटी’साठी लवकरच बैठक
सावंतवाडी बसस्थानक आणि मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल ही दोन कामे माझ्या मतदारसंघामध्ये विशेषतः सावंतवाडीत रेंगाळली होती. यातील मल्टिस्पेशालिटी प्रश्न सोडवण्यासाठी आपण लवकरच बैठक घेऊन मार्ग काढणार आहे. बसस्थानकाचे कामसुद्धा पुढील दोन वर्षांत मार्गी लावण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.