पाच रुपयांच्या नोटेवरील
ट्रॅक्टरने लावला ९ लाखांचा चुना
रत्नागिरीत एकाची फसवणूक ः सोशल मीडियावरील रील्स पडले महागात
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ ः पाच रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टरचे चिन्ह असल्यास तुम्हाला १५ लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखवून रत्नागिरी शहराजवळील भाटीमिऱ्या येथील एकाची ९ लाख २१ हजार ७०१ रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरण हेमंत मारुती शिवलकर (वय ५१, रा. भाटीमिऱ्या) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. अमित चव्हाण (रा. उत्तर प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवलकर यांनी सोशल मीडियावर एक जाहिरात पाहिली होती. त्या जाहिरातीच्या माध्यमातून संशयित अमित चव्हाण याने त्यांच्याशी संपर्क साधला. जुन्या ५ रुपयांच्या नोटेवर ट्रॅक्टरचे चिन्ह असल्यास त्याचे १५ लाख रुपये मिळवून देऊ, असे अमित याने हेमंत यांना सांगितले. ही रक्कम मिळवून देण्यासाठी संशयिताने शिवलकर यांच्याकडून विविध बँक खात्यांवर आणि वेळोवेळी ऑनलाईन ९ लाख २१ हजार ७०१ रुपये उकळले. संशयिताने केवळ पैसे उकळले नाहीत तर फिर्यादी शिवलकर यांच्या बँकखात्याचा वापर इतर लोकांची फसवणूक करण्यासाठीही केला.
दरम्यान, सोशल मीडियावरील कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. जुन्या नोटा किंवा नाणी खरेदी-विक्रीच्या नावाखाली पैसे मागणाऱ्यांपासून सावध राहा. अशा प्रकारचे व्यवहार अधिकृत नसून ही फसवणुकीची मोठी जाळी असू शकते, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
बँकेत गेल्यावर फुटले बिंग
शिवलकर नियमितपणे बँकेत जात नसत; मात्र नुकतीच बँकेकडून खात्याबाबत माहिती घेतली असता फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. मंगळवारी (ता. १४) त्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
खात्यात जमा करून नंतर रक्कम काढली
इतर लोकांकडून फसवणुकीची रक्कम शिवलकर यांच्या खात्यात जमा करून घेऊन ती नंतर काढून घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत. उत्तर प्रदेशातील संशयिताचा शोध घेण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.