तत्त्कालीन सरपंचांसह तिघांवर फौजदारी
रत्नागिरी न्यायालयाचे आदेश ; जयगडमधील निधी गैरव्यवहार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १६ : तालुक्यातील जयगड ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच, ग्रामसेविका आणि अन्य एकावर १५व्या वित्त आयोगाच्या निधीतील आर्थिक गैरव्यवहार आणि फसवणुकी प्रकरणी फौजदारी खटला चालवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
जयगड ग्रामपंचायतीला प्राप्त झालेल्या १५व्या वित्त आयोगाच्या निधीतून महिला प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आला होता. या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होते. १७ फेब्रुवारी २०२३ झालेल्या ग्रामसभेत या अपहारित रकमेची वसुली करून संबंधितांवर पोलिस तक्रार करण्याचा ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला होता. ग्रामस्थ देवदास गणपत चव्हाण यांनी या प्रकरणी जयगड पोलिस ठाणे, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे पुराव्यानिशी तक्रार केली होती; मात्र, कोणत्याही विभागाने दखल न घेतल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली.
न्यायालयाने संशयितांविरुद्ध खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, प्रशिक्षण कार्यक्रमाचा मक्ता देताना कोणतीही पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवली नाही. ३० दिवसांचे प्रशिक्षण केवळ १० दिवसांत आटोपले तरीही पैसे पूर्ण ३० दिवसांचे उचलले गेले. रक्कम संस्थेच्या खात्यावर जमा न करता अध्यक्षांच्या वैयक्तिक बँकखात्यात जमा केली गेली आणि दप्तरी खोटी नोंद करण्यात आली.
----
१५ वर्षांतील गैरव्यवहार बाहेर
सरकारी यंत्रणांनी या प्रकरणाकडे डोळेझाक केली असताना न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे समाधान वाटत आहे. हे तर केवळ हिमनगाचे टोक असून, गेल्या १५ वर्षांतील आर्थिक गैरव्यवहार बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार देवदास चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.