देवरुख महाविद्यालयात सलग वाचन अभियान
देवरुखः शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र देणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करत, त्यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त देवरुख येथील महाविद्यालयात ''१२ तास सलग वाचन'' अभियान यशस्वी करण्यात आले. या उपक्रमाला विद्यार्थी व प्राध्यापकांचा चांगला प्रतिसाद लाभला. या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आणि त्यांच्या जीवनावर आधारित दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शनही भरवले होते. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन आंबेडकरी साहित्याचा व विचारांचा लाभ घेतला. ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे म्हणाले, महाविद्यालयात केवळ पुस्तके उपलब्ध करून न देता, ''एएसपी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सेल'' आणि ''कॉलेज रिडर्स क्लब''च्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी व टेस्ट सिरीज राबवल्या जातात. तसेच व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अद्ययावत माहिती व घडामोडी पुरवल्या जात आहेत. यावेळी ''वाचाल तर वाचाल'' या अभिनव उपक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या हस्ते करण्यात आले.
---