पटसंख्या टिकवण्यासाठी ‘गुरुजींची’ वणवण
जिल्ह्यात शाळा प्रवेशासाठी घरोघरी भेटी; गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर विविध सुविधा
सकाळ वृत्तसेवा
देवरूख, ता. २० ः नवीन शैक्षणिक वर्षाचे बिगुल वाजण्यास आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि माध्यमिक व खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे. एकेकाळी शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रांगा लागायच्या, मात्र आता पटसंख्या टिकवण्यासाठी शिक्षकांना ‘घर टू घर’ धावपळ करावी लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
काही वर्षांपासून विद्यार्थी संख्येत वाढ करण्यासाठी शाळांमध्ये एक प्रकारची स्पर्धा निर्माण झाली आहे. विशेषतः खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी विविध ‘फंडे’ वापरले जात आहेत. अनेक खासगी संस्थांनी इतर शाळांमधील विद्यार्थ्यांना खेचण्यासाठी स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले आहे. या परीक्षांच्या माध्यमातून आकर्षक पारितोषिके, शैक्षणिक सवलती, शिष्यवृत्ती आणि मोफत मार्गदर्शन वर्गांचे आश्वासन पालकांना दिले जात आहे. या स्पर्धेत आता जिल्हा परिषदेच्या शाळांनीही कंबर कसली आहे.
जिल्हा परिषद शाळांनी ‘लोकसहभागातून शाळा’ आणि ‘गुणवत्तापूर्ण शिक्षण’ या मुद्द्यांवर भर दिला आहे. शिक्षकांचे गट तयार करून गावागावात पालकांच्या भेटी घेतल्या जात आहेत. प्रवेशासाठी पात्र असलेल्या बालकांच्या घरी जाऊन शिक्षक पालकांशी थेट संवाद साधत आहेत. शाळेतील मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, पोषण आहार तसेच डिजिटल शिक्षणाची माहिती दिली जात आहे. पटसंख्या वाढवण्यासाठी अनेक शाळांनी आता विशेष शिकवणी, इंग्रजी संभाषण प्रशिक्षण संगणक शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळांचे आयोजन केले आहे
केवळ शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवरही खासगी संस्थांनी लक्ष केंद्रित केले आहे. खासगी शाळांच्या बसेस आता दुर्गम भागातही पोहोचत असल्याने जिल्हा परिषद शाळांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. यामुळेच ग्रामीण भागातील ‘वाड्या-वस्त्यांवर’ जाऊन शिक्षक आपल्या शाळेची पटसंख्या टिकवण्यासाठी वणवण फिरताना दिसत आहेत.
------
जिल्ह्यातील शाळांची स्थिती
* जिल्हा परिषद शाळा - २,३६२
* खासगी व माध्यमिक शाळा- ४५०
* १ ते २० पटाच्या जिल्हा परिषद शाळा- १,३००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.