38394
देवगडातील वीज पुरवठा अखेर सुरळीत
ट्रान्स्फॉर्मर बदलला; गैरसोयीमुळे सोशल मीडियावर टीकेची झोड
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १९ ः येथील देवगड जामसंडे शहरातील वीज पुरवठा शनिवारपासून वारंवार खंडित होत असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले होते. महावितरणचे अधिकारी, कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सतत कार्यरत होते. शहरातील एक विद्युत रोहित्र (ट्रान्स्फॉर्मर) नादुरूस्त झाल्याने परिसरातील खंडित झालेला वीज पुरवठा आज दुपारच्या सुमारास सुरळीत झाला. वीज समस्यांमुळे अनेकांना गैरसोय सोसावी लागली. सोशल मीडियावरून नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत होता.
येथील शहरातील बीएसएनएल सेवेप्रमाणेच वीज समस्यांनी नागरिक त्रस्त झाले होते. मोबाईल सेवा पूर्ण क्षमतेने मिळत नसल्याने आधीच नागरिक त्रस्त असतानाच त्यातच वीज समस्यांनीही नागरिक हैराण झाले होते. साधारण शनिवारी (ता.१८) सकाळपासून अधूनमधून शहराच्या विविध भागांत वीज समस्या जाणवत होती. अधूनमधून शहराचा वीज पुरवठा खंडित होत होता. त्यामुळे नागरिकांसह व्यापारी त्रस्त होते. आज अक्षय्यतृतीया सण असल्याने नागरिकांना वीज समस्येचा त्रास जाणवला. पीठगिरणी वीज समस्येमुळे बंद राहत असल्याने सामान्य नागरिकांनाही त्याचा त्रास झाला. तसेच बाजारातही सणाच्या निमित्ताने खरेदीला येणाऱ्या ग्राहकांनाही त्रास झाला. शनिवार रात्रीपर्यंत विजेचा खेळखंडोबा सुरू होता. त्यामुळे काही व्यावसायिकांनी वेळीच दुकाने आवरती घेतली. वीज समस्येमुळे हॉटेल व्यावसायिकांना वीज समस्येचा त्रास झाला. दरम्यान, रात्री शहरातील मध्यवर्ती भागातील एक विद्युत रोहित्र नादुस्त झाल्याने परिसरातील वीज पुरवठा बंद झाला. विद्युत रोहित्र तातडीने बदलणे अशक्य असल्याने काहीभाग अंधारात गेला. आज दुपारच्या सुमारास विद्युत रोहित्र बदलण्याचे काम करण्यात आले. शहरातील विजेच्या समस्येमुळे सोशल मीडियावरून प्रतिक्रिया उमटत होत्या. वीज समस्येमुळे नागरिकांच्या रोषाला महावितरणच्या अधिकाऱ्यांना सामोरे जाण्याची वेळ आली. मात्र, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी धडपडत असल्याचेही चित्र होते.
--------
उकाड्यामध्ये वीज समस्येने हैराण
सध्या उकाड्याने नगारिक त्रस्त आहेत. उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. त्यातच वीज समस्या उद्भवत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पाण्याचे पंप, घरगुती उपकरणे चालवताना अडचणी येत असल्याने गृहिणीही त्रस्त होत्या. उकाड्यामुळे पंखे नसल्याने वृद्ध आणि लहान मुलांनाही त्याचा त्रास जाणवला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.