‘शक्तिपीठ’ राधानगरीमार्गे सिंधुदुर्गात आणा
संदेश पारकर ः जिल्ह्याला बगल, तर पर्यटन-व्यापारावर परिणाम
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २० : ‘‘शक्तिपीठ महामार्गाची नवी रचना सिंधुदुर्गसाठी कोणत्याही फायद्याची नाही. प्रस्तावित मार्ग राधानगरी परिसराच्या जवळून जात आहे. त्यापुढे हा महामार्ग राधानगरीमार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जावावा,’’ अशी भूमिका नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी आज मांडली.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. पारकर बोलत होते. ते म्हणाले, ‘‘राधानगरी ते सिंधुदुर्ग अंतर सुमारे ३० ते ४० किलोमीटर आहे. हा महामार्ग सिंधुदुर्गात मुंबई-गोवा महामाार्गाला जोडावा अथवा ‘ग्रीनफिल्ड’ संकल्पनेनुसार सह्याद्रीच्या पायथ्याशी समांतर नवीन मार्ग विकसित करून बांद्यापर्यंत न्यावा. या निर्णयामुळे ‘सह्याद्री’ पायथ्याच्या गावांचा सर्वांगीण विकास, आर्थिक दळणवळण आणि रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल.’’
श्री. पारकर म्हणाले, ‘‘महामार्गाची आखणी करताना कणकवली, ओरोस, कुडाळ आणि सावंतवाडी या शहरांना थेट ‘कनेक्टिव्हिटी’ देणे अत्यावश्यक आहे. प्रस्तावित संकेश्वर-रेड्डी चौपदरीकरण आणि घोटगे-पाटगाव महामार्गाशी जोडणी केल्यास सिंधुदुर्ग-कोल्हापूर प्रवासाचा कालावधी सध्याच्या तीन ते साडेतीन तासावरून अवघ्या एक ते दीड तासांवर येऊ शकतो.’’
पारकर म्हणाले, ‘‘सध्याच्या नियोजित शक्तिपीठ महामार्गामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन आणि व्यापाराच्या दृष्टीने थेट फायदा होत नाही. तर त्याचा अधिक लाभ गोव्याला होणार आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाचा असल्याने त्याचा प्राथमिक फायदा राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यालाच व्हावा, ही आमची ठाम भूमिका आहे.’’
---
कोट
38505
शक्तिपीठ महामार्ग थेट गोव्यात उतरवला, तर पर्यटक सिंधुदुर्ग टाळून थेट गोव्यात जातील, ज्यामुळे जिल्ह्याचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. भविष्यात पर्यायी मार्ग विकसित झाल्यास मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कमी होऊन कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, ओरोस आणि कसाल या शहरांवर आर्थिक परिणाम होण्याची भीती आहे.
- संदेश पारकर, नगराध्यक्ष, कणकवली
---
38553
...तर जिल्ह्यातील पर्यटनाला असा होईल फायदा
सिंधुदुर्ग हा राज्यातील महत्त्वाचा पर्यटन जिल्हा आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे गोव्याऐवजी सिंधुदुर्गातील पर्यटनाला चालना मिळणे आवश्यक आहे. राधानगरीमार्गे मार्ग दिल्यास सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला, सावंतवाडीतील मोती तलाव व राजवाडा, दाजीपूर अभयारण्य, आंबोली व सावडाव धबधबा, रांगणागड, तसेच देवगड-मालवण-वेंगुर्ला किनारपट्टी या पर्यटनस्थळांना मोठा फायदा होईल.
---
धार्मिक पर्यटनातही वाढ
‘शक्तिपीठ’ संकल्पनेनुसार कुणकेश्वर, आंगणेवाडी, माणगाव दत्त मंदिर, वालावल लक्ष्मीनारायण मंदिर आणि धामापूर येथील भगवती मंदिर यांसारख्या धार्मिक स्थळांनाही थेट लाभ होऊन धार्मिक पर्यटनात वाढ होईल. सध्या कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे येथून मोठ्या प्रमाणात पर्यटक सिंधुदुर्गात येत असून, राधानगरीमार्गे जोड दिल्यास ही संख्या आणखी वाढेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.