38546
कणकवली : येथील गडनदीपात्रात शिवडाव धरणाचे पाणी दाखल झाल्याने शहरवासीयांची पाणी टंचाईतून सुटका झाली आहे.
तहानलेल्या कणकवलीला तूर्त दिलासा
धरणाचे पाणी नदीपात्रात; ‘शिवडाव’पाठोपाठ ‘हरकुळ’चेही पाणी येणार
सकाळ वृत्तसेवा
कणकवली, ता. २० : उन्हाच्या झळा तीव्र होत असताना कणकवली तालुक्यात पाणी टंचाईचीही तीव्रता वाढू लागली होती. यंदा मार्च अखेरीस अनेक गावातील विहिरींनी तळ गाठल्याने एप्रिल, मेमध्ये तीव्र पाणी टंचाईची शक्यता होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी शिवडाव धरणाचे पाणी गडनदीपात्रात दाखल होऊन ते कणकवली शहरापर्यंत आले आहे. तर हरकुळ धरणाचे पाणी जानवली नदीपात्रात सोडले असून हे पाणी पुढील दोन दिवसांत कणकवली शहर हद्दीपर्यंत येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, यंदा एप्रिल महिन्यातच शिवडाव आणि हरकुळ धरणाचे पाणी नदीपात्रात दाखल झाल्याने तालुक्यातील दोन्ही नदीकाठच्या गावांची पाणी टंचाईतून सुटका झाली आहे. मात्र यंदा अल निनोचे संकट आहे. त्यात सन २०२३ प्रमाणे यावर्षीही जून अखेरपर्यंत मान्सून लांबला तर तालुक्यात पुन्हा पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
सिंधुदुर्गात गतवर्षी १२ मेपासूनच पावसाला सुरवात झाली होती. एवढेच नव्हे तर मे महिन्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे गतवर्षी पाणी टंचाई कुठेच निर्माण झाली नव्हती. यंदा मात्र कमी पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर गेले काही दिवस वातावरणात प्रचंड उकाडा आहे. दुपारनंतर ढगांचीही दाटी होत आहे. मात्र, पाऊस होत नसल्याने उष्मा वाढत आहे. यंदाच्या तीव्र उष्यामुळे जलस्त्रोत आटले आहेत. त्यामुळे विहिरींतील पाण्याची पातळी कमालीची खालावली आहे.
कणकवली शहरातील गडनदी पात्रातील दोन केटी बंधाऱ्यामध्ये पाणी साठविले होते. गळतीमुळे यातील बहुतांश पाणी वाया गेल्याने मार्च महिन्याच्या मध्यापासूनच पाणी टंचाईचे सावट कणकवली शहरवासीयांवर होते. ही बाब ओळखून नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी शिवडाव धरणाचे पाणी गडनदीपात्रात सोडण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाला दिले होते. त्यासाठीची पाणीपट्टी देखील पाटबंधारे विभागाकडे वर्ग केली होती. त्यानुसार दहा दिवसांपूर्वी पाटबंधारे विभागाने कणकवली शहरवासीयांसाठी शिवडाव धरणाचे पाणी गडनदीपात्रात सोडले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून हे पाणी कणकवली नळयोजनेच्या जॅकवेल भागापर्यंत पोचले आहे. त्यामुळे मे अखेर पर्यंत तरी कणकवली शहरवासीयांची पाणी टंचाईतून सुटका झाली आहे.
दरम्यान, पुढील काही दिवसांत धरणातील पाणी शहरालगतच्या आशिये, कलमठ आणि वागदे गावांतही दाखल होण्याची शक्यता आहे. हे पाणी येताच या गावांचाही पाणी प्रश्न निकाली निघणार आहे. शिवडाव धरणाचे पाणी गडनदीपात्रात दाखल झाल्याने गडनदी काठी असलेल्या शिवडाव, सांगवे, हरकुळ बुदूक आणि हळवल या गावांना दिलासा मिळाला असून येथील नळयोजना पुन्हा कार्यान्वित झाल्या आहेत.
--------
38548
‘हरकुळ’चे पाणीही लवकरच
तालुक्यातील हरकुळ खुर्द धरणाचे पाणी देखील आठ दिवसांपूर्वी जानवली नदीपात्रात सोडले आहे. सध्या हे पाणी साकेडी गावापर्यंत दाखल झाले असून पुढील दोन दिवसांत हे पाणी कणकवली शहर हद्दीपर्यंत येण्याची शक्यता आहे. हरकुळ धरणातील पाण्यामुळे हरकुळ खुर्द, नागवे, करंजे आणि जानवली या गावांना दिलासा मिळणार आहे. यंदा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जानवली नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा हाेता. मात्र तीव्र उष्म्यामुळे हा साठा झपाट्याने कमी झाला असून सध्या जानवली नदीपात्र कोरडे होेत चालले आहे. जानवली नदीपात्रातील पाणी साठा संपल्याने नागवे ग्रामपंचायतीने तातडीने हरकुळ धरणाचे पाणी गडनदीत सोडण्यात मागणी केली होती. तर कणकवली नगरपंचायतीच्या मागणीनंतर शिवडाव धरणाचे पाणी गडनदीपात्रात सोडण्यात आले.
----
तालुक्यातील ६३ गावांमध्ये टंचाई
यंदा कणकवली तालुक्यातील ६३ गावांमध्ये पाणी टंचाईची स्थिती आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी ३५ वाड्यांमध्ये विंधन विहिरी खोदण्याची कामे जिल्हा परिषदेमार्फत सुरू केली आहेत. तर विहिरी खोल करून त्यातील गाळ काढण्याची कामे २८ ठिकाणी सुरू आहेत. या कामांसाठी शासनाने ५३ लाख ६० हजार रूपयांची तरतूद केली आहे. याखेरीज अतिवृष्टी कालावधीत घरांमध्ये पुराचे पाणी जाऊन तेथील नुकसानी टाळण्यासाठी तालुक्यातील वागदे आणि आशिये येथील नदीपात्रातील गाळ उपसा देखील केला जात आहे.
--------------------
‘जानवली’त केटी बंधाऱ्यांची गरज
नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पांतर्गत गडनदीपात्रात नरडवे, दिगवळे, दारिस्ते, शिवडाव, सांगवे, हरकुळ, हळवल, वरवडे, किर्लोस आणि कणकवली शहरातील कनकनगर आणि मराठा मंडळ येथे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधले आहेत. याच धर्तीवर जानवली नदीपात्रातही केटी बंधारे बांधण्याची मागणी येथील गावांतून होत आहे.
--------------
कोट
शहराची संभाव्य पाणी टंचाईची स्थिती पाहता, नगरपंचायतीच्या माध्यमातून २८ मार्च रोजी शिवडाव धरणाचे पाणी गडनदीपात्रात सोडण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली होती. त्यासाठीची पाणीपट्टी देखील पाटबंधारे विभागाकडे भरणा केली. गेल्या काही दिवसांत मुबलक प्रमाणात धरणाचे पाणी कणकवलीतील दोन बंधाऱ्यांमध्ये साठले आहे. याखेरीज आम्ही कणकवली नळयोजनेतून कलमठ गावाला देखील पाणीपुरवठा करत आहोत. पाऊस पडेपर्यंत कणकवलीवासीयांना कोणतीही पाणी टंचाई जाणवणार नाही.
- संदेश पारकर, नगराध्यक्ष कणकवली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.