-rat२०p१२.jpg-
26O38524
रत्नागिरी ः मिऱ्या-नागपूर महामार्गावर साळवी स्टॉप येथे निवारा शेड नसल्यामुळे एसटीची प्रतीक्षा करणारे प्रवासी.
---
महामार्गावर एसटी प्रवाशांची गैरसोय
निवारा शेडचा अभाव; रखरखत्या उन्हाचा त्रास, उपाययोजनेची गरज
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २० ः मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून, शहरातील साळवी स्टॉप चौकात वाहनांची नियमित गर्दी होत आहे. या कामामुळे येथील एसटी बसथांबा हलविण्यात आला आहे. परिणामी, प्रवाशांना रस्त्यावरच उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत असून, निवारा शेड नसल्याने भरउन्हात हाल सहन करावे लागत आहे.
रत्नागिरी मुख्य रस्त्यावरून ये-जा करणारी वाहने तसेच एसटी बसची वर्दळ मोठ्या प्रमाणात असल्याने या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. हातखंबाहून येताना साळवी स्टॉप चौक, तसेच रत्नागिरी ते कोकणनगर-चर्मालय आणि साळवी स्टॉप या मार्गांवर सकाळी व सायंकाळी वाहनांची मोठी गर्दी असते. साळवी स्टॉप येथे निवारा शेड नसल्याने प्रवाशांना उन्हातच रस्त्यावर उभे राहावे लागते.
दोन वर्षांपासून मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम सुरू आहे. साळवी स्टॉप ते नर्मदा सिमेंट कंपनी परिसरातील काम जलदगतीने पूर्ण व्हावे, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे. कोकणनगर, मिरजोळे, शीळ, करबुडे या भागांकडे जाणाऱ्या वाहनांनाही या कामामुळे मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.
साळवी स्टॉप येथे रस्त्याचे सपाटीकरण करण्यात आले असून, रत्नागिरीकडे जाण्यासाठी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत; मात्र नर्मदा सिमेंटकडून तसेच हातखंबा मार्गावरून येणाऱ्या अवजड वाहनांची संख्या अधिक असल्याने दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. रस्त्यावरील धुरळ्यामुळे साळवी स्टॉप परिसरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून, झाडे व इमारतींवर धुळीचा थर साचला आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे पाणी शिंपडण्याचीही गरज नागरिक व्यक्त करत आहेत.
---
प्रवाशांची गैरसोय दूर करा
मिऱ्या-नागपूर महामार्गावर नर्मदा सिमेंट ते साळवी स्टॉप आणि रत्नागिरी शहर ते साळवी स्टॉप हे मार्ग जोडले गेले आहेत. या रस्त्यावर दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. त्यामुळे वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी तसेच प्रशासनाने साळवी स्टॉप येथे तातडीने निवारा शेड उभारून प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
दृष्टिक्षेपात...
* धुळीचे साम्राज्य
* वाहतूक कोंडीचा त्रास
* इमारतींवर धुळीचे थर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.