38699
सरपंच गावकरांचे योगदान प्रेरणादायी
विक्रांत सावंत : ओटवणे येथे गौरव सोहळा
सकाळ वृत्तसेवा
ओटवणे, ता. २१ : गेली सात दशके ओटवणे गावाने दिलेल्या प्रत्येक पदाला न्याय देत वृद्धापकाळात देखील गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा आदर्श सरपंच दाजी गावकर यांच्या कडून घेतला पाहिजे. गावच्या विकासासह धार्मिक, सामाजिक व सहकार क्षेत्रात दिलेले योगदान हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यामुळे त्याचे व्यक्तीमत्त्व ओटवणे गावासाठी भूषणावह असल्याचे प्रतिपादन माजगाव जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी केले.
ओटवणे सरपंच आत्माराम उर्फ दाजी गावकर यांच्या गौरव सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्री. सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उपसरपंच संतोष कासकर, माजी सरपंच रवींद्र म्हापसेकर, गुरु मळेकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष सगुण गावकर, सामाजिक कार्यकर्ते बबलू गावकर, ग्रामपंचायत सदस्य महेश चव्हाण, प्रशांत बुराण, समीक्षा गावकर, दशावतारी कलाकार विठ्ठल गावकर, कांता मेस्त्री, नाना गावकर, ओटवणे सोसायटी उपाध्यक्ष स्वप्निल उपरकर, सदस्य प्रदीप दळवी, सचिव अश्विनी तावडे, कवी रामदास पारकर, गुंडू जाधव आदी उपस्थित होते. यावेळी दाजी गावकर यांनी आपण गावाच्या हितासाठी काम करत असताना रवळनाथाच्या कृपाशीवादासह आबाल वृद्धांचे सहकार्य लाभले. या सर्वांच्या पाठबळामुळेच आपल्या हातून समाजकार्य घडले. यात आपण समाधानी असून ओटवणेवासीयांचे आभार मानत यापुढेही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने कार्यरत राहण्याची ग्वाही दिली. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी दाजी गावकर यांच्या कार्याचे कौतुक करीत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला ओटवणे गावातील सुभाष गावकर, भगवान तावडे, अमोल गावकर, गुरु बुराण, दशरथ शृंगारे, सुनिल मेस्त्री, विश्वनाथ बोर्ये, शांताराम श्रृंगारे, अंकुश वारंग, बाळा कर्पे, जादूगार वैभव कुमार पारकर, राजन गावकर, प्रमोद गावकर, भिकाजी बिले, लूमा जाधव आदी उपस्थित होते. जयगणेश गावकर यांनी आभार मानले.