swt2114.jpg
38709
सावंतवाडी : धवडकी ते सांगेली, कलंबिस्त, शिरशिंगे, शिवापूर या राज्यमार्गाच्या पहिल्या टप्प्याच्या कामाचे उद्घाटन करताना शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब. सोबत माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, वामन नार्वेकर, उपसरपंच सुरेश पास्ते, संतोष नार्वेकर, दीपक सांगेलकर, अभय किनळोस्कर व इतर.
धवडकी-शिवापूर राज्यमार्ग दिशादर्शक ठरेल
संजू परब ः पहिल्या टप्प्यातील रुंदीकरण कामाचे लोकार्पण उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २१ ः धवडकी ते सांगेली, कलंबिस्त, शिरशिंगे, शिवापूर या मुख्य राज्यमार्ग १९० या रस्त्याचे रुंदीकरण अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाले आहे. आगामी काळात हा रस्ता मुंबई, गोवा आणि कोल्हापूर या शहरांना जोडणारा पर्यटनाचा व विकासाचा एक प्रमुख केंद्रबिंदू ठरणार आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून आणि सुमारे २ कोटी ७० लाख रुपये खर्चून या मार्गाच्या पहिल्या टप्प्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. या विकासकामामुळे सह्याद्री पट्ट्यातील दुर्गम भागाला एक नवी संजीवनी मिळणार असून सांगेली ते शिरशिंगे-कलंबिस्त या पुढील टप्प्याचे कामही लवकरच मार्गी लावले जाईल, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी केले.
या राज्यमार्गाच्या रुंदीकरण कामाचे उद्घाटन जिल्हाप्रमुख परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व फीत कापून उत्साहात करण्यात आले. श्री. परब म्हणाले, ‘‘हा राज्यमार्ग निश्चितच या भागाच्या विकासाला नवी दिशा देणारा ठरेल. आमदार केसरकर यांनी सह्याद्री पट्ट्यातील गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हे रुंदीकरणाचे काम हाती घेतले होते. या कामामुळे आता या दुर्गम भागातून सावंतवाडी शहरात अवघ्या अर्ध्या तासात पोहोचणे शक्य होणार आहे. हा मार्ग पारगडमार्गे कोल्हापूरला जोडण्यासाठी निश्चितपणे समिती गठित करून पाठपुरावा केला जाईल.’’
उपतालुकाप्रमुख जीवन लाड म्हणाले, ‘‘आमदार केसरकर यांच्या माध्यमातून रस्त्याचे महत्त्वाचे काम पूर्ण झाले आहे. पुढील टप्प्याचे काम हाती घेतल्यास कलंबिस्त आणि शिरशिंगे परिसराचा विकास अधिक गतीने होईल.’’
कार्यक्रमाचे औचित्य साधून रस्त्यासाठी सहकार्य करणारे जमीन मालक रमेश नाईक व वामन नार्वेकर यांचा सत्कार संजू परब यांच्या हस्ते करण्यात आला. तत्पूर्वी, उपतालुकाप्रमुख जीवन लाड यांनी जिल्हाप्रमुख परब यांचा सत्कार केला. उद्घाटनप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, वामन नार्वेकर, उपसरपंच सुरेश पास्ते, संतोष नार्वेकर, दीपक सांगेलकर, अभय किनळोस्कर, उपविभाग प्रमुख संजय पालकर, ओबीसी तालुकाप्रमुख वासुदेव होडावडेकर, अमित चव्हाण, प्रकाश सावंत, गणपत राणे, मुख्याध्यापक रामचंद्र घावरे, चंद्रकांत राणे, चेतन सावंत, हनुमंत पास्ते, सचिन नार्वेकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.