rat२२p७.jpg-
26O38878
रत्नागिरी ः शहरातील नाचणे येथे आठवडा बाजार येथील सुकी मच्छीविक्रेते.
---
आगोटासाठी महिलांची बाजारात गर्दी
सुक्या मासळीचे दर वधारले; सिलिंडरच्या टंचाईमुळे सरपणावर भर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ ः एप्रिल महिना संपत आला की, कोकणवासियांना वेध लागतात ते पावसाळ्याचे. पावसात खाद्यपदार्थांची आणि इंधनाची अडचण भासू नये यासाठी पूर्वापार चालत आलेल्या आगोट म्हणजेच पावसाळ्यापूर्वीची साठवणुकीच्या तयारीला वेग आला आहे. आठवडा बाजारांमध्ये खरेदीसाठी महिलांची वर्दळ वाढली आहे; मात्र यंदा पावसाळ्यासाठीच्या सुक्या मासळीचे दर कडाडलेले आहेत. यावर्षी शेवटच्या टप्प्यात अपेक्षित मासे मिळत नसल्याने हा परिणाम झाल्याचे मच्छीमारांनी सांगितले. यावर्षी सिलिंडरच्या टंचाईचे सावट असल्याने ग्रामीण भागात लाकडांचा साठा केला जात आहे. त्यासाठी लाकडांची खरेदी-विक्री होत आहे.
पावसाळ्यासाठी घराघरांतून वर्षभराचे मसाले, विविध प्रकारची लोणची, पापड, सांडगे आणि फेण्या यांसारखे पदार्थ वाळवून साठवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरातील मसाला कांडप यंत्रांवर (चक्की) मिरची दळून घेण्यासाठी महिलांच्या रांगा लागल्या आहेत. खाद्यपदार्थांसोबतच फणसाचे तळलेले गरे, कोकम आणि सुकी मासळी विकत घेतली जात आहे. शासकीय नियमानुसार १ जूनपासून पुढील दोन महिने समुद्रातील मासेमारी बंद असते. हा काळ माशांच्या प्रजोत्पादनाचा असल्याने मांसाहारी खवय्यांसाठी ‘सुकी मासळी’ हाच एकमेव उत्तम पर्याय उरतो; मात्र, यंदा हवामानातील बदल आणि परराज्यातील बोटींचा वाढलेला वावर यामुळे मासळीची आवक घटली आहे. परिणामी, साठवणुकीच्या काळात सुक्या मासळीचे भाव गगनाला भिडले आहेत; परंतु कोकणातीलच नव्हे तर परजिल्ह्यातील आणि मुंबईकर चाकरमानीही चढ्या दराने मिळणारी सुकी मासळी खरेदी करण्यावर भर देत आहेत.
दरम्यान, सध्या ग्रामीण भागात गॅस सिलिंडर वेळेवर मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यात अन्नासाठी वणवण होऊ नये म्हणून ग्रामीण व शहरालगतच्या भागात जळाऊ लाकडांची (सरपण) बेगमी करण्यावर भर दिला जात आहे. वाढत्या वृक्षतोडीमुळे सुक्या लाकडांची उपलब्धता कमी झाली असली तरी पावसाळ्याची निकड म्हणून ठिकठिकाणी सरपणाचे ढीग रचले जात असल्याचे चित्र दिसत आहे.
---
सुक्या मासळीचे दर (प्रतिकिलो/नग):
सोडे : १,८०० रु. (प्रतिकिलो)
सुरमई : १,५०० रु. (प्रतिकिलो)
बोंबील : ७०० रु. (प्रतिकिलो)
बगी/म्हाकूळ : ७०० रु. (प्रतिकिलो)
बला : ४०० रु. (प्रतिकिलो)
खारा बांगडा : १०० रु. (प्रति नग)
कोलीम : ३०० रु. (पायली)
मांदेली/लेपा/ढोमी : १०० ते २०० रु. (एका वाट्यात १५ ते २० मासे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.