रत्नागिरीत भाजपचे नवे ‘डाव पेच’
निरंजन डावखरे जिल्हा प्रभारी; ‘कमळ’ फुलवण्याचे आव्हान
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : राज्यातील आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाने आपली संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. याच रणनीतीचा एक भाग म्हणून कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांची रत्नागिरी दक्षिण जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची पाळेमुळे घट्ट करण्याची जबाबदारी डावखरे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे.
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे (शिंदे गट) वर्चस्व आहे. राजापूरपासून ते चिपळूण-गुहागरपर्यंत सामंत बंधूंनी स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपली पकड मजबूत केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये त्यांच्या समर्थकांचा भरणा असून, नगरपालिकेतही त्यांचेच वर्चस्व राहिले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या वेळी रत्नागिरी नगरपालिकेच्या जागावाटपात भाजपने ११ जागांची मागणी केली असताना पालकमंत्री उदय सामंत यांनी भाजपला केवळ ६ जागांवर समाधान मानण्यास भाग पाडले होते. यावरून जिल्ह्यात भाजपची ताकद मित्रपक्षासमोर काहीशी कमी पडत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत, आमदार डावखरे पक्षवाढीसाठी नेमकी कोणती जादू करणार, हा कळीचा मुद्दा आहे. त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे पक्षातील अंतर्गत मरगळ झटकणे हे आहे.
भाजपचे अनेक माजी जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते सध्या सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर आहेत. या अनुभवी नेत्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणून त्यांना कामाला लावणे, हे डावखरेंसाठी पहिले शिवधनुष्य असेल. दुसऱ्या बाजूला, सामंत बंधूंच्या वाढत्या प्रभावापुढे भाजपचा स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्याचेही आव्हान त्यांच्यासमोर आहे.
----
निवडणुकीनंतर ‘त्यांची’ रत्नागिरीकडे पाठ
आमदार निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेवर प्रतिनिधित्व करत आहेत. तरी गेल्या काही काळात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांशी त्यांचा संपर्क तुटल्याची चर्चा खुद्द भाजप कार्यकर्त्यांमध्येच होती. निवडणुका जिंकल्यानंतर ते मतदारांना विसरले की काय, असा सूर उमटत असतानाच पक्षाने त्यांना याच भागाची जबाबदारी दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.