ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना बळ
पाच पूल अन् दोन रस्त्यांचा समावेश; ११ कोटी ७३ लाखांचा निधी मंजूर
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २३ : जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी आणि पावसाळ्यात ग्रामस्थांची होणारी गैरसोय कायमची दूर करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नाबार्डच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या ‘आरआयडीएफ ३१’ या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाच ग्रामीण पूल आणि दोन महत्त्वाच्या रस्त्यांच्या बळकटीकरणासाठी तब्बल ११ कोटी ७३ लाख रुपयांचा (११७३.४८ लाख) निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे संगमेश्वर, गुहागर आणि रत्नागिरी तालुक्यातील दळणवळण अधिक सक्षम होणार आहे.
जिल्ह्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी शासनाने एकूण सात प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. यामध्ये प्रामुख्याने पाच ग्रामीण पुलांचे बांधकाम आणि दोन रस्त्यांच्या बळकटीकरणाचा समावेश आहे. या सर्व कामांसाठी प्रशासकीय पातळीवर ११ कोटी ७३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संगमेश्वर, गुहागर आणि रत्नागिरी या तालुक्यांमधील प्रलंबित कामांना यात प्राधान्य देण्यात आले आहे. या निधीतून संगमेश्वर तालुक्यातील मौजे डिंगणी येथील नदीवर पुलाचे बांधकाम करण्यासाठी सर्वाधिक ३ कोटी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
गुहागर तालुक्यातील पडवे आणि रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथील पुलांच्या कामांसाठीही प्रत्येकी दीड कोटींहून अधिक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुलांच्या कामांसोबतच ग्रामीण रस्त्यांची अवस्था सुधारण्यावरही भर देण्यात आला आहे. संगमेश्वर तालुक्यातील शिवणे-ओझरे आणि रत्नागिरी तालुक्यातील चाफे-धनावडेसारख्या ग्रामीण रस्त्यांच्या खडीकरण आणि डांबरीकरणासाठी प्रत्येकी सव्वा कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.
---
२०२८ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
हे सर्व मंजूर प्रकल्प ३१ मार्च २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. पावसाळ्यात अनेकदा नद्यांना येणाऱ्या पुरामुळे ग्रामीण भागाचा मुख्य प्रवाहाशी संपर्क तुटतो. अशा परिस्थितीत हे नवीन पूल आणि रस्ते ग्रामस्थांसाठी खऱ्या अर्थाने ‘जीवनवाहिनी’ ठरणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.