swt246.jpg
39414
सावंतवाडी : शहरात झालेल्या वित्तहानीची पाहणी करताना आमदार दीपक केसरकर व नगराध्यक्ष श्रद्धा भोसले सोबत इतर.
चक्रीवादळाच्या प्रमाणकाखाली पंचनामे करा
दीपक केसरकर : नगराध्यांसह शहरात पाहणी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २४ : शहरात चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाचे स्वरूप मोठे आहे. पावसाच्या सामान्य नियमांतर्गत भरपाई न देता, चक्रीवादळाच्या प्रमाणकाखाली पंचनामे करून विशेष बाब म्हणून मदत देण्याच्या सूचना मी तहसीलदारांना दिल्या असल्याचे आमदार दीपक केसरकर यांनी आज स्पष्ट केले.
शहरात रात्री झालेल्या भीषण चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी नगराध्यक्ष श्रद्धा भोसले यांच्यासह शहरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. आमदार केसरकर यांनी सबनीसवाडा, मोती तलाव परिसर, रामेश्वर प्लाझा आणि श्री पंचम खेमराज महाविद्यालय या भागांची पाहणी केली. यावेळी ते म्हणाले की, कालचा प्रकार हा केवळ पाऊस नसून ते चक्रीवादळ होते. त्यामुळे पावसाच्या सामान्य नियमांतर्गत भरपाई न देता, चक्रीवादळाच्या प्रमाणकाखाली पंचनामे करून विशेष बाब म्हणून मदत देण्याच्या सूचना मी तहसीलदारांना दिल्या आहेत. याबाबत लवकरच बैठक घेऊन ही मदत तातडीने मिळवून दिली जाईल.
ते पुढे म्हणाले, येत्या सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मी कोकणातील शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे पुन्हा एकदा लक्ष वेधणार आहे. पावसाचा वाढता जोर पाहता शेतकऱ्यांना अधिकच्या मदतीची गरज असून, ती मिळवून देण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू राहील. महावितरणचा खंडित पुरवठा युद्धपातळीवर सुरळीत करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
या पाहणी दौऱ्यावेळी आमदार दीपक केसरकर आणि नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्यासोबत मुख्याधिकारी विनायक औंधकर, युवराज लखमराजे भोंसले, नगरसेवक अजय गोंदावळे, सुकन्या टोपले, प्रतिक बांदेकर, वैभवकुमार अंधारे, दीपक म्हापसेकर, जयप्रकाश सावंत, हेमंत बांदेकर, अर्चित पोकळे यांसह पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
------------------------
चौकट
धोकादायक फांद्या हटवा
नगराध्यक्षा श्रद्धा भोसले यांनीही पथकासह नुकसानीची पाहणी केली. शहरातील नागरिकांना मदत करण्यासाठी पालिकेची टीम तैनात आहे. नगरसेवकांच्या माध्यमातून प्रत्येक नुकसानीची माहिती घेतली जात आहे. महावितरणसोबत बैठक घेऊन पावसाळ्यापूर्वी धोकादायक फांद्या हटवण्याबाबत कडक सूचना दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री नीतेश राणे आणि राज्य सरकारकडून सावंतवाडीला निश्चितच भरीव मदत मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
-----------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.