मंडणगडात ‘जलजीवन मिशन’ची गती मंदावली
१०२ गावांत २४ कोटींचा खर्च ; नागरिक पाण्यासाठी व्याकूळ
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २६ ः केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत ‘हर घर जल’ योजनेची तालुक्यात अंमलबजावणी सुरू असली, तरी कामांचा वेग अपेक्षेप्रमाणे नसल्याचे चित्र समोर आले आहे. तालुक्यात एकूण १०२ गावांसाठी ४४.०८ कोटी रुपयांचा निधी मंजूर असूनही, आतापर्यंत केवळ २४.८६ कोटी रुपये खर्च झाले आहेत. अनेक गावांत कामे अद्याप अपूर्ण असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
तालुक्यातील १०२ गावांपैकी केवळ ६९ गावे आतापर्यंत ‘हर घर जल’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. उर्वरित गावांमध्ये कामे विविध टप्प्यांवर रखडली आहेत. दाभट, मुरादपूर, रानवळी आणि गोवळ ही चार गावे ‘नो डिमांड’ श्रेणीत आहेत. योजना राबवताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून समजते. यामध्ये मुख्यत्वे जागेच्या अडचणी, सुधारित अंदाजपत्रकांना लागणारा विलंब, निधीची उपलब्धता आणि प्रशासकीय मान्यतेतील दिरंगाई यामुळे कामांचा वेग मंदावला आहे. वाढीव कामांच्या मागणीमुळे काही जुन्या योजनांमध्ये तांत्रिक बदल करावे लागत आहेत.
दरम्यान, या योजनेची कामे रखडल्याने ग्रामीण भागात पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. भोळवली देवाचा डोंगर, वाल्मिकी नगर आणि कोंडगाव या गावांना सध्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सर्व गावांना शुद्ध पाणी देण्याचे उद्दिष्ट अद्याप दूर असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
चौकट
कामाच्या प्रगतीचा आढावा
* ७५ ते १०० टक्के पूर्ण : केवळ १० गावे.
* ५० ते ७५ टक्के पूर्ण : १३ गावे.
* २५ ते ५० टक्के पूर्ण : १० गावे.
कोट
अनेक गावांतून अजूनही नियमित नळजोडणी झालेली नाही. योजना कागदावर चांगली दिसते; पण प्रत्यक्षात कामांचा वेग खूपच कमी आहे. पाण्यासाठी आजही रोजची धावपळ करावी लागते. संबंधित प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कामे पूर्ण करावीत.
- बिपीन पेंढारी, मंडणगड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.