39946
निरवडे : येथे बेशिस्त कामामुळे रस्त्याची अशी दुरवस्था झाली आहे.
निरवडे-तळवडे रस्त्याचे काम बेशिस्त
स्थानिक हैराण; आंदोलन छेडण्याचा इशारा
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता.२७ : तालुक्यातील निरवडे झरबाजार ते तळवडे या महत्त्वाच्या मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या बेशिस्त कामाबाबत सध्या ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. संबंधित ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि कामात होत असलेल्या विलंबामुळे आता लोकप्रतिनिधींनी आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या दोन दिवसांत काम पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे; मात्र, पावसाळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही काम पूर्ण झालेले नाही. निरवडे ग्रामपंचायत प्रशासन आणि उपसरपंच अर्जुन पेडणेकर यांनी वारंवार सूचना देऊनही ठेकेदाराने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. जर पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण आणि इतर दुरुस्ती पूर्ण झाली नाही, तर या मार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होऊन शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांची मोठी गैरसोय होणार आहे.
रस्त्याच्या कामात कमालीचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याची बाजूपट्टी अद्याप भरलेली नाही. त्यामुळे दोन चारचाकी वाहने समोरासमोर आल्यास गाडी रस्त्याखाली उतरवणे अशक्य झाले आहे. त्यातच एका ठिकाणी सुमारे १०० मीटर भागात रस्त्याच्या एका बाजूची माती काढून मोठा खड्डा करून ठेवला आहे. यामुळे रात्रीच्या वेळी किंवा पावसाच्या अंधारात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
------
रस्त्याकडेचे विद्युत खांब खिळखिळे
रस्त्याकडेची माती काढल्यामुळे त्या ठिकाणचे विद्युत आणि इतर खांब खिळखिळे झाले आहेत. हे खांब कोणत्याही क्षणी कोसळून मोठी मनुष्यहानी होऊ शकते. या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपसरपंच अर्जुन पेडणेकर यांनी प्रशासनाला विचारला आहे. आता संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग यावर काय कारवाई करतो आणि ठेकेदाराला पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्यास कसे भाग पाडतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
---
कोट
रस्त्यावरील खड्डे आणि कामाचा सुमार दर्जा यामुळे जनतेचा रोष वाढत आहे. दोन दिवसांत जर संबंधित ठेकेदाराने काम मार्गी लावले नाही, तर ग्रामस्थांना सोबत घेऊन संबंधित विभाग आणि ठेकेदाराच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल.
- अर्जुन पेडणेकर, उपसरपंच
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.