देवगड-नालासोपाराची
एसटी बस ठाणेमार्गे न्या
मनसेचे प्रशासनाला निवेदन
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २७ ः प्रवाशांच्या सोयीसाठी येथील आगारातून सुटणारी देवगड नालासोपारा ही प्रवासी फेरी ठाणेमार्गे करण्याची मागणी आहे. या मागणीचे निवेदन येथील आगार व्यवस्थापकांना मनसेच्या वतीने देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील अनेकजण कल्याण, डोंबिवली, कळवा, बदलापूर, दिवा आदी भागांत राहतात. त्यांना ये-जा करण्यासाठी ठाणेमार्गे एकही प्रवासी फेरी नाही. या मार्गावरील गाड्या सायनमार्गे बोरीवली जाणाऱ्या आहेत. त्यामुळे या भागातील प्रवाशांना ठाणेमार्गे फेरीची आवश्यकता आहे. ही गैरसोय दूर करण्यासाठी आगारातून नालासोपारा जाणारी प्रवासी फेरी ठाणेमार्गे केल्यास याचा प्रवाशांना लाभ होईल. असे केल्याने नालासोपारा गाडीलाही भारमान वाढेल. तसेच ही फेरी हंगामापुरती न ठेवता कायमस्वरूपी असावी, अशीही मागणी केली आहे.