swt2730.jpg
40117
मालवण ः वाळू उपशावर कारवाई करण्याबाबत रेवंडी ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन दिले.
तोंडवळी खाडीतील वाळू उपसा रोखा
रेवंडी ग्रामस्थांची मागणी ः मालवण तहसीलदारांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. २७ : तोंडवळी ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये नायब तहसीलदार व महसूल अधिकारी यांच्या समक्ष वाळू उपसा विरोधात ठराव घेतलेला असतानाही प्रत्यक्षात तोंडवळी गावातील लोकप्रतिनिधींच्या संमतीने व सहभागाने तोंडवळी तळाशील गावातील खाडीपात्रामध्ये सध्या पंचवीस ते तीस बोटींद्वारे मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे, असा आरोप रेवंडी ग्रामस्थानी करत या वाळू उपशावर कारवाई करावी, अशी मागणी मालवण तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
रेवंडी येथील ग्रामस्थांनी आज मालवण तहसील कार्यालयात नायब तहसीलदार जांभेकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी रेवंडीचे सरपंच अमोल वस्त, ग्रामपंचायत सदस्या मेघना कांबळी, युवराज कांबळी, दिलीप मोर्वेकर, सचिन मोर्वेकर, विजय कांबळी, प्रसन्न कांबळी, भावेश कांबळी, संतोष मुणगेकर, प्रसाद कांबळी, मिलिंद कांबळी, विनायक कांबळी, प्रीतेश मयेकर, शामराव कांबळी, अनिरुद्ध पोयरेकर आदी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
कालावल खाडीतील वाळू उपसा थांबविण्यासाठी तळाशील ग्रामस्थ ज्या ठिकाणी उपोषणास बसले होते, त्या तळाशील येथील श्रीकृष्ण मंदिरनजीकच्या ठिकाणाजवळ शासनाचा बंधारा फोडून तेथे जेसीबीच्या सहाय्याने वाळू उत्खनन चालू आहे. त्यावर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी रेवंडी ग्रामस्थांनी केली. तोंडवळी ग्रामपंचायतीमार्फत वाळू उपसा बंदीचा ठराव चुकीच्या पद्धतीने मंजूर झाला असून शासनाची फसवणूक करून शासनाला फक्त दिखावा करून दाखवण्यासाठी हा ठराव घेतलेला आहे, असा आरोप रेवंडी ग्रामस्थांनी केला.
तळाशील येथील वाळू उपसा होणाऱ्या ठिकाणी तत्काळ पंचनामा करून बेकायदेशीर वाळू उपसा कायम थांबवण्यात यावा. वाळू उपसा करणाऱ्या व्यक्तींची वापरात असलेली बोट व यंत्रसामग्री जप्त करण्यात यावी. शासकीय बंधारा वाळू उपसा करण्यासाठी तोडलेला असून, त्यामुळे होणारी नुकसानी संबंधितांकडून वसूल करून कठोर कारवाई करावी. कांदळवन तोडलेले असल्यामुळे सीआरझेड अधिसूचना २०१९ नुसार कांदळवन क्षेत्र हे सीआरझेड १-आयए नुसार सर्वात संवेदनशील असल्याने त्यांच्यावर पर्यावरण सर्वेक्षण कायदा व इतर तरतुदींनुसार गुन्हे दाखल करावेत, अशा मागण्या रेवंडी ग्रामस्थांनी केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.