कोकण

वर्धापन लेख ः 9

CD

(वर्धापन लेख ः ९)
(टीप ः हा लेख पुरवणीच्या पहिल्या पानासाठी घेणे)

- ratvardha१९.jpg-
26O41782
हर्णै बंदरातील मच्छीमारी नौका.
- ratvardha२१.jpg-
26O41783
बंदरावरील मासळी खरेदीसाठीची झुंबड.
- ratvardha२८.jpg-
26O41789
पर्यटकांना आकर्षित करणारे किनाऱ्यावरील पक्षी
----
कोकण किनाऱ्याचा प्रश्न सामाजिक, आर्थिक सुरक्षिततेचाही

सकाळी लवकर कोकणच्या कोणत्याही समुद्रकिनाऱ्यावर गेलं की, एक वेगळाच अनुभव येतो. पर्यटकांची गर्दी नसते, गाड्यांचा आवाज नसतो, फक्त लाटांचा लयबद्ध आवाज, खडकांवर आदळणारा फेस आणि एखादा स्थानिक मच्छीमार आपली जाळी सावरताना दिसतो. अशा शांतवेळी समुद्राकडे पाहताना प्रकर्षाने जाणवते की, हा केवळ पाण्याचा प्रचंड साठा नाही, तर कोट्यवधी वर्षांच्या उत्क्रांतीचा, मानवी स्मृतींचा आणि संघर्षाचा जिवंत साक्षीदार आहे. कोकणच्या किनाऱ्याचा प्रश्न केवळ पर्यावरणाचा नाही; तो सामाजिक आणि आर्थिक सुरक्षिततेचा प्रश्न आहे. जैवविविधता कमी झाली तर मासेमारी कमी होईल, मासेमारी कमी झाली तर रोजगार कमी होईल आणि रोजगार कमी झाला तर गावं ओस पडतील. आमच्या अभ्यासात स्थलांतराची साखळी अनेक ठिकाणी दिसून आली आहे. त्यामुळे संवर्धन म्हणजे विकासाला विरोध नव्हे, तर ते गाव टिकवण्याचं साधन आहे. आपण सर्वांनी मिळून कोकण आणि समुद्र वाचवायला हवे, तो आपल्या संस्कृतीचा, उपजीविकेचा आणि भविष्याचा आधार आहे.

- डॉ. सायली नेरूरकर
---
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांत विस्तारलेली ~ ४८० किलोमीटरची कोकण किनारपट्टी भौगोलिकदृष्ट्या अरुंद असली तरी तिची पर्यावरणीय आणि सामाजिक व्याप्ती अफाट आहे. ही किनारपट्टी म्हणजे जैवविविधतेची शाळा, लाखो लोकांच्या उपजीविकेचा आधार, कोकणी लोकसंस्कृतीचं मूळ आणि सामाजिक नात्यांचा धागा आहे. ‘प्रोजेक्ट कोस्टल २.०’ अंतर्गत गेल्या काही वर्षांत या किनाऱ्यांचा अभ्यास करताना एक सत्य प्रकर्षाने समोर आले की, समुद्र जितका निसर्गाचा भाग आहे तितकाच तो इथल्या मानवी संस्कृतीच्या केंद्रस्थानी आहे.
*जैवविविधतेची प्रयोगशाळा ः इंटरटायडल परिसंस्था
ओहोटीच्यावेळी जेव्हा समुद्र मागे सरकतो तेव्हा उघड्या पडणाऱ्या किनारी भागाला ‘इंटरटायडल झोन’ (Intertidal Zone) म्हणजेच ‘आंतर भरती-ओहोटी प्रदेश’ म्हणतात. हा प्रदेश जैवविविधतेची खाण आहे. वालुकामय आणि खडकाळ किनारे हे विविध सागरी अपृष्ठवंशी आणि पृष्ठवंशी प्राण्यांचे निवासस्थान आहेत. ‘प्रोजेक्ट कोस्टल २.०’ च्या अभ्यासात या भागात ६००हून अधिक प्रजातींची नोंद झाली आहे. वालुकामय किनाऱ्यांवर तारामासे, विविध प्रकारचे शंख-शिंपले, पारदर्शक भिंगासारखे टिनोफोर, किनाऱ्यावर वाहून आलेले ब्ल्यू बटण हायड्रोईड, मोठ्या आकाराचे मलेशियन जेलिफिश आणि पोर्तुगीज मॅन ओ वॉर’ (फायसेलीया) सहज नजरेस पडतात. याशिवाय, येथे विविध प्रकारचे खेकडे आणि लहान समुद्री जीव दिसून येतात. खडकाळ किनाऱ्यांवरील ज्वारीय तलावांमध्ये (टाईड पूल) रंगीबेरंगी स्पंज, प्रवाळ, झुॲन्थस, समुद्रपुष्पे (सी ॲनिमोन), समुद्री गोगलगायी, समुद्र काकडी, ऑक्टोपस, कालवं (ऑयस्टर), शेवंड (लॉबस्टर), विविध प्रकारचे खेकडे आणि कोळंबीचे प्रकार आढळतात. येथे वावरणारे छोटे रंगीत मासे आणि शंख-शिंपल्यांचे प्रकारही सागरी जैवविविधतेला अधोरेखित करतात. यामध्ये अनेक प्रजाती अशा आहेत की, ज्या केवळ विशिष्ट तापमानात आणि स्वच्छ पाण्यातच जगू शकतात. स्थानिक मच्छीमारांना माहीत असते की, कोणत्या खडकाखाली ‘माशांची पिल्लं’ वाढतात किंवा कुठे खेकडे सापडतात. हे त्यांचे पारंपरिक ज्ञान विज्ञानाच्या ‘इकोसिस्टिम सर्व्हिसेस’ (Ecosystem Services) या संकल्पनेशी तंतोतंत जुळते.
कोकणच्या खाड्यांलगत पसरलेली खारफुटीची (Mangroves) जंगले ही कोकणच्या सागरी परिसंस्थेचा कणा मानली जातात. ही जंगले एक ‘नैसर्गिक सुरक्षाकवच’ म्हणून काम करत किनाऱ्यांचे धूप, वादळे आणि भरतीच्या तडाख्यापासून संरक्षण करतात. तसेच विविध मासे, कोळंबी आणि इतर सागरी जीवांसाठी सुरक्षित प्रजोत्पत्ती व वाढीची ठिकाणे निर्माण करतात. याचबरोबर खारफुटी ही ब्लू कार्बन साठवण्याची अत्यंत प्रभावी प्रणाली असून, जमिनीवरील जंगलांच्या तुलनेत कैकपटीने अधिक कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता त्यांच्यात आहे. त्यामुळेच कोकणातील अनेक गावांची अर्थव्यवस्था मच्छीमारीवर अवलंबून आहे आणि स्थानिक मच्छीमारांना कोणत्या खडकाखाली किंवा चिखलात माशांची पिल्ले वाढतात याचे सखोल पारंपरिक ज्ञान आहे, जे विज्ञानातील ‘इकोसिस्टिम सर्व्हिसेस’ या संकल्पनेशी पूर्णपणे सुसंगत ठरते. कोस्टल २.०च्या सर्वेक्षणातूनही हे स्पष्ट झाले आहे की, ज्या गावांच्या किनारी दाट खारफुटी आहे तेथे वादळांचा परिणाम तुलनेने कमी जाणवतो. तरीसुद्धा विकासाच्या नावाखाली या जंगलांचे होत असलेले अतिक्रमण आणि तोड भविष्यात गंभीर पूर, मासेमारीतील घट आणि किनारी असुरक्षिततेचे संकट उभे करू शकते. म्हणूनच खारफुटीचे संरक्षण हे पर्यावरणीय गरजेसोबतच कोकणच्या भविष्यासाठी अत्यावश्यक आहे.
गेल्या काही वर्षांत कोकणचा समुद्र आणि मानव यातील नातं हळूहळू ढासळत चाललं आहे. आमच्या अभ्यासात अनेक गावांमध्ये एकच चिंता ऐकू आली, ‘समुद्र बदलतोय.’ मासे कमी होत आहेत, काही प्रजाती दिसेनाशा झाल्या आहेत, हंगाम अनिश्चित झाला आहे, चक्रीवादळांचं प्रमाण वाढलयं. यामागे कारणं अनेक आहेत. प्लास्टिक कचरा, थर्माकोल, सांडपाणी, टाकलेल्या मासेमारी जाळ्या (ghost nets), अनियंत्रित पर्यटन आणि जागतिक हवामान बदल. काही किनाऱ्यांवर टाइडपूल्समध्ये कचरा टाकणे, पर्यटकांच्या वाहनांमुळे किनारी प्रदेश चिरडले जातात. खडकांवरून चालताना लहान प्राणी नष्ट होतात. यामुळे सूक्ष्म परिसंस्था नष्ट होत आहेत. प्रक्रिया न केलेले सांडपाणी समुद्रात सोडल्यामुळे पाण्याचे तापमान आणि रसायनांचे प्रमाण वाढत आहे. हे नुकसान अनेकदा लगेच दिसत नाही; पण त्याचे परिणाम खोलवर जातात आणि परिसंस्थेवर दीर्घकालीन प्रभाव टाकतात.
प्रदूषणामुळे मासे, कासवे, समुद्री सरीसृप आणि पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे. अनेकदा सजीव प्रत्यक्ष जाळीत अडकून मरतात किंवा त्यांच्या नैसर्गिक निवासस्थळाचा नाश होतो. समुद्रातील बायकॅच किंवा अनावश्यक पकड यामुळे संवेदनशील प्रजाती मृत्युमुखी पडतात आणि हे सजीव परिसंस्थेतील संतुलन राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. हवामान बदलामुळे समुद्राचे तापमान वाढले आहे. महासागराचे आम्लीकरण (ocean acidification) वाढले आहे, ऑक्सिजनची पातळी कमी होत आहे आणि सूक्ष्मजीव व प्लँक्टनसारख्या तळघर सजिवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. हे परिणाम फक्त समुद्रापुरते मर्यादित नाहीत; ते समाजापर्यंत पोहोचतात. कोकणातील सुमारे २.५ लाख मच्छीमार थेट समुद्रावर अवलंबून आहेत. त्यांची उपजीविका आणि आर्थिक सुरक्षितता या बदलांमुळे धोक्यात येत आहे. मासे कमी होणे, साठे बदलणे, पारंपरिक मासेमारी पद्धती टिकू न शकणे आणि हवामानाच्या अनिश्चिततेमुळे ग्रामीण समुदायांचा सामाजिक वारसा हळूहळू ढासळतो आहे. मासेमारीच्या अनिश्चित उत्पन्नामुळे केवळ आर्थिकच नव्हे, तर सामाजिक असुरक्षितता वाढून मोठ्या प्रमाणावर शहरांकडे स्थलांतर होत आहे.
या संकटांमध्येही एक आशेचा किरण दिसतो तो म्हणजे समुदायाचा सहभाग. ‘प्रोजेक्ट कोस्टल २.०’ ने दाखवून दिलं की संवर्धन केवळ नियम लावून होत नाही, तर ते लोकांना सोबत घेऊनच होतं. मच्छीमार, महिला बचतगट, शालेय विद्यार्थी, स्थानिक युवक हे सगळे जेव्हा समुद्राकडे ‘आपला’ म्हणून पाहू लागतात तेव्हा बदल सुरू होतो. काही ठिकाणी महिलांनी कचरा वर्गीकरण सुरू केलं तर काही गावांत विद्यार्थ्यांनी जैवविविधतेची नोंद ठेवायला सुरुवात केली. या छोट्या कृती समुद्राच्या भविष्यासाठी मोठ्या ठरू शकतात.

*पर्याय ः शाश्वत कृती आणि समाजाचा सहभाग
‘प्रोजेक्ट कोस्टल २.०’ च्या अनुभवांवरून आपल्याला स्पष्ट झाले आहे की, कोकणच्या समुद्राचे भविष्य आपल्या हातात आहे. जर आपण एकत्र येऊन काम केले, तर हा किनारा फक्त जिवंत राहणार नाही तर आपल्या अनेक पिढ्यांसाठी सुरक्षित आणि समृद्ध राहील.
*जैवविविधतेचे शहाणे नियोजन आणि तटसंवर्धन ः स्थानिक ग्रामसभांमध्ये कृती योजना तयार करून बायोडायव्हर्सिटी अ‍ॅक्शन प्लॅन्स (BAP) चा अवलंब करणे महत्त्वाचे आहे. यामध्ये संरक्षणासोबतच ग्रामस्तरावर जीवसृष्टीशी सुसंगत उपजीविका आणि नियोजनाचा समावेश आहे. CRZ (Coastal Regulation Zone)चे कडक पालन करून किनाऱ्यावरील ५०० मीटरच्या मर्यादेत होणारी अनधिकृत बांधकामे रोखणे आवश्यक आहे.
*ब्लू इकॉनॉमी (Blue Economy) ः केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांत समुद्राच्या आर्थिक वापरासोबतच त्याच्या संवर्धनाला प्राधान्य देणे.
राज्य आणि केंद्र सरकारला जैवविविधतेच्या संवेदनशील क्षेत्रांची शिफारस करून आणि पर्यावरणपूरक पर्यटन धोरण मांडण्यासाठी स्थानिक निरीक्षणांचा उपयोग करता येईल. आपण आपल्या गावातील अनुभव, कोस्टल २.०चा डाटा आणि पारंपरिक ज्ञान एकत्र करून धोरणनिर्मितीत हातभार लावू शकतो. प्रत्येक ग्रामसभेने आपल्या गावातील समुद्री संपत्तीचा आराखडा म्हणजेच ‘बायोडायव्हर्सिटी अ‍ॅक्शन प्लॅन्स’ (BAP) तयार करून तिच्या रक्षणाची जबाबदारी घ्यावी. किनाऱ्यांवरील कचरा वर्गवारी, प्लास्टिकचा पुनर्वापर, ‘घोस्ट नेट्स’ (टाकलेली जाळी) गोळा करून पुनर्वापरासाठी पाठविणे, या उपक्रमांमुळे किनारा स्वच्छ आणि सुरक्षित राहील. ही सवय स्थानिक गावकऱ्यांपासून पर्यटकांपर्यंत सगळ्यांमध्ये पसरविणे अत्यंत आवश्यक आहे.

तुमच्या गावात अजूनही कोणती ठिकाणे नैसर्गिकरीत्या सुरक्षित आहे? जरा लक्ष द्या.
ही ठिकाणे टिकविण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
शाळेत तुम्ही कधी टाइडपूल्सवर प्रायोगिक अभ्यास केला आहे का?
मासे, खेकडे, गोगलगायी नोंदविले आहेत का? नाही?
मग, आता सुरुवात करा. लहान पावले, मोठा बदल. महिला बचतगट, युवक संघटना. तुम्ही समुद्र संवर्धनात कशी मदत करू शकता? प्लास्टिक गोळा करणे, निसर्ग शिक्षण कार्यक्रम चालविणे किंवा स्थानिक निरीक्षणात सामील होणे हे तुम्ही नक्की करू शकता!
तुमच्या गावातील खारफुटी अजून जिवंत आहे का? जरा पाहा, स्पर्श करा, फोटो काढा आणि नोंद ठेवा, लक्ष ठेवा. ही जंगले गावांना वादळ आणि पुरापासून वाचवतात!
-----
समुद्राशी नातं जपणारी संस्कृती
कोकणमधील समुद्राशी जोडलेली संस्कृती ही केवळ मासेमारीपुरती मर्यादित नाही. सण, जत्रा, देवदेवता, स्थानिक कथा सगळं समुद्राभोवती फिरतं. कोळी बांधवांची गाणी, सण (नारळी पौर्णिमा) आणि परंपरा यांत समुद्राबद्दलचा आदर दिसून येतो. काही गावांत अजूनही मासेमारी सुरू करण्याआधी समुद्राला नमस्कार केला जातो. हे केवळ श्रद्धेचं लक्षण नाही तर समुद्राबद्दल असलेला आदर आणि भीती यांचा समतोल आहे. पारंपरिक मच्छीमार समुद्राशी झगडत नाही तो त्याला समजून घेतो. त्यामुळेच त्याच्या मासेमारीत अतिरेक कमी असतो. ‘प्रोजेक्ट कोस्टल २.०’ च्या निरीक्षणात हे स्पष्टपणे दिसलं की, ज्या ठिकाणी पारंपरिक ज्ञान अजून वापरात आहे तिथे जैवविविधतेचं नुकसान तुलनेने कमी आहे.


(लेखिका इकोलॉजिकल सोसायटी, पुणे येथे समुद्र जीवशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बंगाल-तमिळनाडू निकालांचा महाराष्ट्रात धसका! 'खाती नीट सांभाळा, काम करा नाहीतर...'; फडणवीसांचा मंत्र्यांना कडक इशारा

अमेरिका इराण युद्ध थांबवणार एक पानी करार, दोन्ही देशांचं जवळपास एकमत; ट्रम्प यांच्या मंत्र्यांने केली घोषणा

लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजे ‘देवमाणूस’! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता म्हणाला...'त्यांनी माझी भाषा ऐकून...'

Supreme Court order Gokul Milk : 'गोकुळ दूध संघाची निवडणूक ९० दिवसांत घ्या' सुप्रिम कोर्टाचे आदेश

Latest Marathi News Live Update : मुरबाड-कल्याण मार्गावर पुन्हा अपघात; एसटी-कारच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT