मालवणात आज
महाराजस्व शिबिर
मालवण ः महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्याकडील शासन निर्णयानुसार तहसील कार्यालय, मालवणमार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-१) अंतर्गत मालवण नगरपालिका व मालवण महसूली मंडळ स्तरावर उद्या (ता. ८) सकाळी १० वाजता शहरातील रघुनाथ देसाई तालुका स्कूल सभागृह येथे महसूल शिबिराचे आयोजन केले असल्याची माहिती तहसीलदार गणेश लव्हे यांनी दिली. तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व महिलांसाठी महसूल विभागातील महत्त्वाच्या १५ सेवांचा लाभ एकाच दिवशी देण्यासाठी हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे. या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार, सात-बारामधील चुकीची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे सात-बारा व ८-अ वाटप, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अकृषिक (एनए) परवानगी, अकृषिक तरतुदीबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहेत. या शिबिरात आरोग्य तपासणीही करण्यात येणार आहे. शहरातील आणि मंडळातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असेही महसूल विभागाने स्पष्ट केले आहे.
....................
शेळपीत अंगणवाडी सेविका,
मदतनिस पदांसाठी भरती
वेंगुर्ले ः तालुक्यातील रेडी ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या म्हारतळे व भोगवे ग्रामपंचायत हद्दीतील शेळपी येथे अनुक्रमे मदतनिस व अंगणवाडी सेविका अशी दोन रिक्त पदांची भरती एकात्मिक बालविका सेवा योजना प्रकल्प अधिकारी यांच्यातर्फे जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी आपले अर्ज २० मे पर्यंत सार्वजनिक सुट्यांचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत बालविकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, वेंगुर्ले कार्यालयात सादर करावेत. अधिक माहितीसाठी दोन्ही ग्रामपंचायतींचे सरपंच किंवा बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
......................
शेलटीत ११ पासून
टेनिस बॉल क्रिकेट
मालवण ः शेलटी बॉयझ यांच्या वतीने ''एक गाव एक संघ'' या संकल्पनेतून भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन ११ ते १४ मे या कालावधीत शेलटी येथे करण्यात आले आहे. विजेत्या संघाला २०,००० रुपये व चषक, तर उपविजेत्या संघाला १०,००० रुपये व चषक प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर अशा वैयक्तिक गटांमध्येही विशेष बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. स्पर्धेसाठी प्रथम येणार्या १६ संघांना प्राधान्य दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी आशिष शेलटकर किंवा सुशील शेडगे, मंदार जुवेकर, प्रथमेश शेडगे व अमित खोत यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
......................
कोंडुरेत रविवारी
दशावतार नाटक
सावंतवाडी ः श्री राष्ट्रोळी युवक मंडळ, कोंडुरे व ग्रामस्थ आयोजित श्री राष्ट्रोळी देवस्थान कोंडुरे वरचीवाडी प्राथमिक शाळेजवळ रविवारी (ता. १०) सायंकाळी ५ वाजता सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. यानिमित्त सायंकाळी ७ ते ९.३० या वेळेत आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद, तर सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ, तळवडे परबवाडी बुवा दिनेश परब व पखवाज नित्यानंद बर्डे यांचे भजन होणार आहे. रात्री ९ वाजता अष्टविनायक पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ, निरवडे यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. या उत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
......................
उभादांडा सिध्देश्वर
वर्धापन आजपासून
वेंगुर्ले ः उभादांडा-सिद्धेश्वरवाडी येथील देव सिद्धेश्वर मंदिराचा १९ वा वर्धापन दिन विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होत आहे. उद्या (ता. ८) सकाळी ८ वाजता देव सिद्धेश्वराची पूजा व अभिषेक, ९ वाजता सिद्धेश्वरवाडीतील मुलामुलींसाठी विविध मनोरंजक स्पर्धा व महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, सायंकाळी ५ वाजता तेथील महिलांसाठी मनोरंजक स्पर्धा, ७ वाजता बक्षीस वितरण समारंभ, रात्री ८ वाजता मुलांचे करमणुकीचे कार्यक्रम, शनिवारी (ता. ९) सकाळी ८ वाजता लघुरुद्र व सत्यनारायण महापूजा, दुपारी १ वाजता महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता ग्रामस्थांचे भजन, ७.३० वाजता रवळनाथ दशावतार नाट्य मंडळ, तेंडोली यांचा ''राजा खटवांग'' अर्थात ''रामदर्शन'' नाट्यप्रयोग होणार आहे. लाभ घ्यावा, असे आवाहन देव सिद्धेश्वर सेवा मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.
......................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.