प्रासंगिक
गौरवशाली इतिहासाचे प्रतीक
‘मिलाग्रिस कॅथेड्रल’
लीड
कोकणच्या मातीतील सर्वधर्मसमभावाचे प्रतीक आणि साडेतीनशे वर्षांच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेल्या सावंतवाडीतील ''मिलाग्रिस कॅथेड्रल''चा नूतनीकरण सोहळा शनिवारी (ता ९ ) होत आहे. पाच वर्षांच्या अथक परिश्रमातून साकारलेली ही भव्य वास्तू आज आपल्या पूर्ण वैभवासह उभी असून, हा सोहळा केवळ ख्रिस्तधर्मीयांसाठीच नव्हे, तर अवघ्या सिंधुदुर्गवासीयांसाठी एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक उत्सवाचा क्षण ठरणार आहे.
-----------------------
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जात आहे. सह्याद्रीच्या कुशीत आणि निसर्गरम्य सावंतवाडीच्या हृदयस्थानी असलेल्या ''मिलाग्रिस कॅथेड्रल''चे नव्याने बांधलेले महामंदिर आज खुले होत आहे. हा एका साध्या मातीच्या वास्तूपासून सुरू होऊन आधुनिक स्थापत्यशास्त्राच्या अत्युच्च शिखरापर्यंत पोहोचलेला एक प्रेरणादायी प्रवास आहे.
सिंधुदुर्ग धर्मप्रांताची मुळे साधारण ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासात रुजलेली आहेत. १७ व्या शतकाच्या मध्यावर गोव्यातील राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेमुळे अनेक कॅथोलिक कुटुंबे सुरक्षिततेच्या शोधात सावंतवाडी संस्थानच्या आश्रयाला आली. त्याकाळी येथील राजघराण्याने या विस्थापितांना मायेचा आधार दिला. या कुटुंबांच्या प्रार्थनेसाठी १६५२ मध्ये माती आणि गवताच्या एका अत्यंत साध्या वास्तूतून ज्या श्रद्धेची बीजे पेरली गेली, त्याचेच रूपांतर आज एका महावृक्षात झाले आहे. १८७९ मध्ये या वास्तूचे दगडी बांधकाम करण्यात आले, तर १९७७ मध्ये वाढत्या लोकसंख्येसाठी हॉल-शैलीतील इमारत उभारण्यात आली. ५ जुलै २००५ हा दिवस या इतिहासातील सुवर्णक्षण ठरला. पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी स्वतंत्र ''सिंधुदुर्ग धर्मप्रांता''ची घोषणा केली आणि सावंतवाडीच्या या चर्चला ''कॅथेड्रल''चा, म्हणजेच धर्मप्रांताच्या मुख्य गुरुपीठाचा सर्वोच्च मान मिळाला. या धर्मप्रांताचे पहिले बिशप म्हणून बहुसन्माननीय अँथनी अल्विन फर्नांडिस बॅरेटो यांची नियुक्ती झाली. त्यांनी १९ वर्षे या भागातील शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा पाया रचला. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर, आता नवनिर्वाचित बिशप फादर फ्रान्सिस्को अग्नेलो पिन्हेरो यांच्या मार्गदर्शनाखाली हा धर्मप्रांत नव्या उमेदीने वाटचाल करत आहे.
केवळ आध्यात्मिक केंद्र न राहता, या वास्तूने सामाजिक परिवर्तनात मोठे योगदान दिले आहे. १९३२ मध्ये फादर रोझारियो मोंटेरो यांनी स्थापन केलेले ''सेंट फिलोमेना हायस्कूल'' (आजचे मिलाग्रिस हायस्कूल) आजही ज्ञानदानाचा वारसा चालवत आहे. तसेच, १९९४ मध्ये स्थापन झालेली कॅथोलिक अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी स्थानिक समुदायाला आर्थिक बळ देत आहे.
सध्याचे रेक्टर फादर मिलेट डिसोझा यांच्या नेतृत्वाखाली २०२१ पासून या कॅथेड्रलच्या पुनर्रचनेचे काम हाती घेण्यात आले होते. आज उभी असलेली ही भव्य वास्तू आधुनिक स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना आहे. तेजस्वी पांढरा दर्शनी भाग आणि वाढीव आसनक्षमता असलेले हे महामंदिर सावंतवाडीच्या सौंदर्यात भर घालत आहे. येथील ''आवर लेडी ऑफ मिरॅकल्स'' (चमत्कारांची माऊली) यांच्यावर सर्वधर्मीय भाविकांची अढळ श्रद्धा आहे. म्हापसा (गोवा) प्रमाणेच येथेही हिंदू-ख्रिश्चन ऐक्याचे दर्शन घडते.
ऐतिहासिक मोती तलाव आणि राजवाड्याच्या सानिध्यात वसलेले हे कॅथेड्रल आता केवळ धार्मिक स्थळ न राहता पर्यटकांचेही आकर्षण केंद्र बनले आहे. ९ मे चा हा लोकार्पण सोहळा म्हणजे कोकणच्या मातीतील त्याग, श्रद्धा आणि सर्वधर्मसमभावाचा एक देदीप्यमान विजयोत्सव आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.