42418
सागरी महामार्गाने घेतला मोकळा श्वास
मालवणात स्वच्छता मोहीम; सभापती चव्हाण यांचा पुढाकार
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ९ : मालवण शहराला स्वच्छ आणि सुंदर बनवण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. आरोग्य व स्वच्छता सभापती पूनम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी शहरातील वर्दळीच्या सागरी महामार्गावर देऊळवाडा ते हॉटेल रामेश्वर या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. विशेष म्हणजे केवळ एक दिवसाचा उपक्रम न थांबवता, आता दरमहा प्रत्येक प्रभागात ही मोहीम राबविण्याचा संकल्प आरोग्य सभापतींनी सोडला आहे.
सागरी महामार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसराचे सौंदर्य धोक्यात आले होते. ही बाब लक्षात घेऊन आज सकाळी आरोग्य विभागाच्या संपूर्ण ताफ्यासह ही मोहीम हाती घेण्यात आली. या मोहिमेत लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून साफसफाई केली. यावेळी सभापती पूनम चव्हाण यांच्यासह उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, आरोग्य व स्वच्छता निरीक्षक संजय पवार, कर्मचारी मंदार केळुसकर, आनंद वळंजू, प्रतीक मालवणकर, पवन धुरी, शिवाजी जाधव यांसह कार्यालयातील अधिकारी आणि सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
केवळ मुख्य रस्त्यांची सफाई करून न थांबता, शहराच्या कानाकोपऱ्यात स्वच्छता पोहोचवण्यासाठी पूनम चव्हाण यांनी विशेष कृती आराखडा जाहीर केला आहे. शहरातील सर्व दहाही प्रभागांमध्ये दरमहा ''एक प्रभाग, एक दिवस'' या धर्तीवर आमची पूर्ण टीम स्वच्छता मोहीम राबवेल. संबंधित प्रभागातील नगरसेवक आणि नगरसेविका यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम वर्षभर सुरू राहणार आहे. मालवण शहर कचरामुक्त करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींचे सहकार्य यात मोलाचे ठरेल, असे श्रीमती चव्हाण यांनी स्पष्ट केले.
------
नगरपालिकेची सक्रिय भूमिका
सागरी महामार्गावर पर्यटकांची आणि स्थानिकांची मोठी वर्दळ असते. या परिसरात साचलेला कचरा उचलल्यामुळे परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. नगरपालिकेच्या या सक्रिय भूमिकेमुळे मालवणवासीयांकडून समाधान व्यक्त होत असून, आगामी काळात प्रभागांमधील मोहिमेमुळे शहराचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.