परिवर्तन---------लोगो
(७ मे टुडे ३)
देवाच्या माध्यमातून
सामाजिक सुधारणा शक्य
घरात ‘श्रीं’ची ईश्वरोपासना नित्यनेमाने सुरू होती. दररोज आंघोळीनंतर अथर्वशीर्ष म्हणणे, सकाळ-संध्याकाळ देवाला नमस्कार आणि वेळ मिळेल तेव्हा स्तोत्र पठण व गीताध्याय वाचन सुरू असे. शहरात स्त्रियांच्या चार दिवसांच्या विटाळ-सोवळ्याबाबतचे नियम फारसे पाळले जात नसत; मात्र ग्रामीण भागात आजही या गोष्टींबाबत कमालीचा आग्रह दिसून येतो. गावात आपल्या घरी हे सोवळे पाळले जावे, असे ‘श्रीं’चेही ठाम मत होते. त्याबाबत कोणतीही तडजोड त्यांना मान्य नसे; प्रसंगी त्यांनी आपल्या पत्नीलाही यावरून स्पष्टपणे सुनावले होते. गावी घरी देवीच्या स्वयंभू पादुका होत्या, त्यामुळे त्यांचे पावित्र्य राखण्यासाठी सोवळ्याचे नियम पाळूनच पूजा व्हायला हवी, अशी त्यांची धारणा होती. शहरात हे नियम शिथिल झाले असले तरी गावी ते पाळणे अनिवार्य आहे, असे त्यांना वाटे.
- rat१३p१.jpg-
26O43152
- डॉ. शरद प्रभूदेसाई, रत्नागिरी
---
‘श्री’ आता गावातील शिवरात्रीच्या उत्सवातही सहभागी होऊ लागले होते. काही वर्षांनी त्यांच्या लक्षात आले की, मंदिराच्या परिसराची डागडुजी करणे अत्यंत आवश्यक आहे. मंदिराच्या सभोवतालच्या दगडी भिंतीवर (ओवरीवर) मोठी झाडे उगवली होती आणि परिसरातही दगडांचा खच पडलेला होता. त्यांनी स्वच्छतेचे काम स्वतःहून हाती घेतले. सर्वप्रथम ओवरीवरील झाडे काढून परिसर सपाट केला.
मंदिराजवळ बाहेर एक ‘तळी’ (पायऱ्यांची विहीर) होती. उत्सवाच्या काळात मंदिरातील कार्यासाठी आणि पिण्यासाठीही वर्षानुवर्षे तिथलेच अस्वच्छ पाणी वापरले जात असे. वास्तविक, मंदिराच्या आवारातच एक चांगली विहीर होती; परंतु ती मातीने भरून बुजवून टाकली होती. ती विहीर पुन्हा स्वच्छ करून तिचे पाणी वापरणे योग्य होते. ‘श्रीं’नी याबाबत वडिलांचा सल्ला घेतला असता त्यांनीही कोणताही विरोध दर्शवला नाही.
ती विहीर का वापरली जात नव्हती, याचे कुतूहल ‘श्रीं’ना वाटू लागले. चौकशीअंती त्यांना समजले की, पुरातन काळी एका महिलेने त्या विहिरीत जीव दिला होता, या भीतीपोटी ती वापरात नव्हती. मात्र, अशा अंधश्रद्धांवर ‘श्रीं’चा बिलकूल विश्वास नव्हता. वडिलांची संमती मिळाल्यावर त्यांनी विहीर उपसण्याचे काम हाती घेतले. अवघ्या दहा फुटांवर स्वच्छ पाण्याचा झरा लागला. तिथे पाणी काढण्यासाठी लाकडी रहाट लावला आणि उत्सवासाठी पंपाची सोयही केली. अशा प्रकारे तळीचे अस्वच्छ पाणी वापरणे कायमचे बंद होऊन विहिरीचे शुद्ध पाणी वापरात आले. ‘धर्माच्या आणि देवाच्या माध्यमातूनही सामाजिक सुधारणा घडवता येतात,’ याची जाणीव ‘श्रीं’ना या निमित्ताने झाली.
एका वर्षी शिवरात्रीच्या उत्सवात गावातील ज्येष्ठ ब्राह्मणांचा सत्कार करण्यात आला. उत्सवात तरुण मंडळी मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे पाहून ज्येष्ठांना आनंद झाला. आपल्या पश्चातही ही परंपरा सुरक्षित हातांमध्ये आहे, या समाधानाने त्यांचे चेहरे उजळले.
‘श्रीं’चे आयुष्य आता स्थिरस्थावर होते. त्यांची ईश्वरोपासना आणि व्यवसाय दोन्हीही उत्तम रीतीने सुरू होते. शहरात त्यांनी स्वतःचे नवीन रुग्णालय उभारले. पायाभरणीच्या वेळी शास्त्रशुद्ध पद्धतीने कोनशिलापूजन केले; मात्र रुग्णालय सुरू करताना त्यांनी वास्तुशांत केली नाही. एरवी निस्सीम देवभक्त असलेल्या ‘श्रीं’ना धार्मिक विधींचे अवडंबर मात्र आवडत नसे. सत्यनारायणाची पूजा किंवा मंदिरांत वारंवार जाणे यात त्यांना फारसा रस नव्हता. इतका देवभक्त माणूस अशा बाबींत उदासीन कसा, याचे अनेकांना आश्चर्य वाटे.
‘श्रीं’चा असा ठाम विश्वास होता की, भक्ती ही प्रदर्शनासाठी नसून स्वतःच्या प्रगतीसाठी असावी. देवभक्तीमुळे आपली बुद्धी सात्त्विक होते आणि विचार संपन्न होतात, अशी त्यांची धारणा होती. लहानपणापासून देवाला नमस्कार करताना ते ‘मला चांगली बुद्धी दे’ असाच वर मागत असत. बालपणी या प्रार्थनेचा अर्थ शालेय अभ्यासातील प्रगती असा होता, तर मोठेपणी त्याचा अर्थ ‘उदात्त आणि प्रगल्भ विचार’ असा झाला. कोणावरही अन्याय करणे किंवा अन्याय सहन करणे त्यांना मान्य नसे. ‘भक्तीमुळे माणसाचे विचार उदात्त कसे होतात’ हे कोडे त्यांना सुटले नव्हते, तरीही तसे घडते यावर त्यांची निष्ठा अढळ होती.
(लेखक बालरोगतज्ज्ञ आणि चिंतनशील अभ्यासक आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.