‘इथे ओशाळला मृत्यू’ चा प्रयोग शंभरीच्या उंबरठ्यावर
स्थानिक कलावंताचे यश: ठाणे येथे होणार प्रयोग
संदेश देसाई : सकाळ वृत्तसेवा
दोडामार्ग, ता. १३ : जिल्ह्यातील स्थानिक कलावंताच्या प्रतिभेच्या जोरावर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित वसंत कानेटकर लिखित ''इथे ओशाळला मृत्यू'' या अजरामर नाट्यकृतीचा १०० वा प्रयोग करण्याच्या मराठी उंबरठ्यावर ’शिवगणेश प्रोडक्शन'' ही संस्था आहे. मीरा भाईंदर येथील गान सम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह येथे उद्या ( ता.१४) संध्याकाळी ३ वाजता हा प्रयोग होऊ घातला आहे. जिल्ह्यातील नाट्य विश्वातील हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे.
सिंधुदुर्ग हा कलाकारांची खाण मानला जातो. याच मातीतील गुणवंत कलाकारांनी एकत्र येत सुरू केलेल्या ''शिवगणेश प्रोडक्शन'' या संस्थेने मराठी रंगभूमीवर आपला वेगळा ठसा उमटवला आहे. ''इथे ओशाळला मृत्यू'' या नाटकाचे १०० वे प्रयोग पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर ही संस्था पोहोचली असून, स्थानिक कलाकारांच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गेल्या काही वर्षांत कोकणातील, विशेषतः सिंधुदुर्गातील अनेक कलाकार मुंबई-पुण्यासारख्या शहरांकडे धाव घेतात. मात्र, ''शिवगणेश प्रोडक्शन''ने स्थानिक स्तरावरच व्यावसायिक दर्जाचे नाटक उभे करून इथल्या कलाकारांच्या अंगी असलेल्या कौशल्याची प्रचिती दिली. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक अशा तिन्ही राज्यांत या नाटकाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
या यशस्वी प्रवासामागे दिग्दर्शक आणि मुख्य अभिनेते गणेश ठाकूर यांचे अभ्यासपूर्ण नेतृत्व आहे. त्यांनी केवळ दिग्दर्शनच केले नाही, तर जिल्ह्यातील नवोदित कलाकारांना एकत्र करून त्यांना व्यावसायिक रंगभूमीचे धडे दिले. डॉ. सोनल लेले यांची खंबीर साथ आणि नाटकाचे योग्य नियोजन यामुळे शंभर प्रयोगांचा हा टप्पा गाठणे शक्य झाले आहे.
हे नाटक उभे करण्यासाठी कलाकारांनी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. सलग तीन महिने बॅरिस्टर नाथ पै सभागृहात घेतलेली तालीम आणि प्रत्येक प्रयोगागणिक अभिनयात आणलेला जिवंतपणा यामुळेच प्रेक्षक या नाटकाकडे खेचले गेले. यातील कलाकारांनी रंगमंचावर एक कुटुंब म्हणून काम केले. यात अभिनयासोबतच प्रकाशयोजना, नेपथ्य आणि पार्श्वसंगीत या तांत्रिक बाजूही स्थानिक तंत्रज्ञांनी उत्तमरीत्या हाताळल्या आहेत.
आजच्या डिजिटल मनोरंजनाच्या काळात, जिथे प्रेक्षक ओटीटी आणि मोबाईलमध्ये व्यस्त आहेत, तिथे जिवंत नाटकाकडे प्रेक्षकांना वळवणे हे मोठे आव्हान होते. मात्र, संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास आणि सिंधुदुर्गातील कलाकारांचा जीव ओतून केलेला अभिनय यामुळे या नाटकाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.लवकरच होणाऱ्या या ऐतिहासिक १०० व्या प्रयोगासाठी संपूर्ण शिवगणेश टीमवर शुभेच्छांचा वर्षाव होत असून, सिंधुदुर्गाच्या नाट्य परंपरेत मानाचा तुरा रोवला गेला आहे.
चौकट
उपमुख्यमंत्री शिंदेच्या उपस्थितीत उद्घाटन
मीरा भाईंदर येथील प्रयोगाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, मत्स्य व बंदर विकास मंत्री नीतेश राणे, तसेच आमदार दीपक केसरकर, नीलेश राणे, सुधीर थोरात, ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अमोल कोल्हे, शंतनु मोघे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
चौकट
हे आहेत कलाकार...
या नाटकात दिग्दर्शक आणि छत्रपती संभाजी महाराजांची मुख्य भूमिका अभिनेते गणेश ठाकूर साकारणार असून डॉ. सोनल लेले, प्रा. मिलिंद कासार, पत्रकार संदेश देसाई, कृष्णा देसाई, अजिंक्य देसाई, मंदार जंगम, आदेश खानोलकर, केशव परब, नवसो परब, लक्ष्मण मांजरेकर, दिनेश परब, मदन गवस, दीपक झोरे हे सह कलाकार आहेत. तांत्रिक बाजू सांभाळणारे सुभाष शिरोडकर, ओंकार नाईक, नित्यानंद पेडणकर, पांडुरंग पांगम, सत्यवान नाईक, रामा गवस, सागर झोळंबेकर, दत्ता गवस, प्रणय गवस हेही भूमिका साकारणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.