पैसा बोलतो, आपण ऐकतो !....लोगो
( ८ मे टुडे १०२)
कर्ज म्हटलं की
दोन टोकाच्या प्रतिक्रिया
‘कर्ज’ हा शब्द जरी उच्चारला की अनेकांच्या मनात दोन टोकाच्या प्रतिक्रिया उमटतात. काहींसाठी तो ताण, ओझं आणि संकट यांचं प्रतीक असतो. तर काहींसाठी कर्ज म्हणजे घर, व्यवसाय किंवा शिक्षणाच्या संधीचं दार. या दोन टोकांच्या धारणा आपल्या समाजात एकाच वेळी अस्तित्वात आहेत ही खरंच गमतीची गोष्ट आहे. पण प्रत्यक्षात कर्ज ना पूर्णपणे वाईट आहे, ना प्रगतीचं हमीपत्र आहे. कर्ज हे एक आर्थिक साधन आहे. त्याचा परिणाम त्याच्या वापरावर अवलंबून असतो.
- rat१४p५.jpg-
26O43346
- सीए वैभव देवधर, रत्नागिरी
----
पूर्वीच्या पिढ्यांना ‘कर्ज घेणं टाळा’ अशीच शिकवण दिली गेली. त्यामागे अनुभव होता. अनिश्चित उत्पन्न, मर्यादित साधनं, उच्च व्याजदर आणि पिळवणूक करणारे सावकार यांच्या काळात कर्ज खरोखरच धोकादायक ठरू शकत होतं. पण आधुनिक अर्थव्यवस्थेत कर्जाशिवाय मोठ्या मालमत्ता निर्माण करणं कठीण आहे. घरकर्ज, शिक्षणकर्ज किंवा व्यवसायासाठी घेतलेलं कर्ज भविष्यातील उत्पन्न वाढवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. त्यामुळे कर्जाचं मूल्यांकन भावनेऐवजी गणितावर आधारित असणं आवश्यक आहे.
कर्जाचं मूलभूत तत्त्व सोपं आहे; आज पैसा वापरण्याची गरज आहे पण हातात पैसा नाही; अशा वेळी आपण कर्ज घेऊन भविष्यातील उत्पन्नाच्या आधारे आज घेतलेल्या पैशाची परतफेड करण्याचं दायित्व स्वीकारतो. म्हणजेच कर्ज हे भविष्यातील कमाईवर ठेवलेला विश्वास आहे. हा विश्वास वास्तववादी असेल तर कर्ज साधन ठरतं; तो अवास्तव असेल तर ओझं बनतं. इथे एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे कॅश फ्लो. कर्जाची रक्कम किती आहे यापेक्षा, मासिक उत्पन्नातून हप्ते भरल्यानंतर किती रक्कम शिल्लक राहते हा प्रश्न अधिक निर्णायक असतो. कर्जामुळे जर मासिक लवचिकता कमी झाली, तर अगदी मध्यम आकाराचं कर्जही ताण निर्माण करू शकतं. त्यामुळे कर्जाचं वजन त्याच्या आकड्यात नसून आपल्या उत्पन्नाशी असलेल्या प्रमाणात असतं.
कर्ज हा केवळ घेणाऱ्याचा निर्णय नसतो; तो देणाऱ्याचाही विचारपूर्वक निर्णय असतो. बँक किंवा वित्तसंस्था कर्ज देताना काही मूलभूत गोष्टी पाहतात. पहिली परतफेड करण्याची क्षमता आणि तारण देण्यासाठी त्या व्यक्तीकडे उपलब्ध असलेल्या मालमत्ता. अर्जदाराचं उत्पन्न स्थिर आहे का? मासिक हप्ते भरल्यानंतर त्याच्याकडे पुरेशी शिल्लक राहते का? आणि कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त रकमेची मालमत्ता त्या व्यक्तीकडे तारण देण्यासाठी आहे का? दुसरी विद्यमान कर्जांची पातळी. आधीच अनेक हप्ते चालू असतील तर नव्या कर्जाची जोखीम वाढते. तिसरी क्रेडिट इतिहास. CIBIL किंवा इतर क्रेडिट स्कोअर संस्थांमधील नोंदी कर्जदाराच्या आर्थिक शिस्तीचं प्रतिबिंब असतात. वेळेवर परतफेडीची सवय ही कर्ज मिळण्याच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. चौथी उत्पन्नाची स्थिरता आणि नोकरी/व्यवसायातील सातत्य.
यातून एक महत्त्वाचा धडा मिळतो. कर्ज घेण्याआधी बँक ज्या गोष्टी पाहते, त्याच गोष्टींच्या चष्म्यातून आपण स्वतःकडेही पाहायला हवे. आपलं उत्पन्न किती स्थिर आहे? आपली विद्यमान आर्थिक दायित्वे किती आहेत? आपण वेळेवर परतफेड करण्याची शिस्त ठेवतो का? हे प्रश्न कर्जाचा निर्णय अधिक परिपक्व करतात.
कर्जाचं आणखी एक वर्गीकरण उपयोगी ठरतं. उत्पादक आणि उपभोगात्मक कर्ज. उत्पादक कर्ज भविष्यात मालमत्ता निर्माण करतं किंवा उत्पन्न वाढवतं जसे की शिक्षणकर्ज, गृहकर्ज किंवा व्यवसायासाठीचं कर्ज. घरातील फ्रीज, वॉशिंग मशीन, फॉरेन ट्रीप अशा उपभोगात्मक गोष्टींसाठी घेतलेलं कर्ज केवळ आजचा खर्च पुढे ढकलतं पण त्यातून ना कुठली संपत्ती निर्माण होते ना भविष्यातील उत्पन्नात वाढ होते. दोन्ही प्रकारचं कर्ज चुकीचं नाही; पण त्यांची जोखीम वेगळी असते.
कर्जाविषयी भीती बाळगणं सोपं आहे; पण त्याकडे दुर्लक्ष करणंही तितकंच धोकादायक आहे. कारण आधुनिक अर्थव्यवस्थेत कर्ज पूर्णपणे टाळणं व्यवहार्य नसतं. योग्य प्रश्न असा आहे की, हे कर्ज माझ्या आर्थिक क्षमतेला बळ देणार आहे का? की मनाला क्षणिक आनंद देऊन आर्थिक क्षमता कमकुवत करणार आहे? कर्जाचं गणित फक्त मूळ रकमेत नसतं. त्याची खरी किंमत व्याजात आणि कालावधीत दडलेली असते. पुढील लेखात आपण व्याजदराचं हे गणित अधिक नेमकेपणाने समजून घेऊ, कारण कर्जाची खरी किंमत तिथूनच सुरू होते.
(लेखक सीए असून रत्नागिरीत प्रॅक्टीस करत आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.