कोकण

कोकणातील बागायतदार दाखवणार ताकद

CD

43423

आंबा-काजू उत्पादक न्यायासाठी रस्त्यावर
आज वर्षावर मोर्चा : सिंधुदुर्गातून शेकडोजण मुंबईकडे रवाना
सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. १४ : कोकणातील वातावरण बदलाने हतबल फळ बागायतदार राजाश्रय मिळावा म्हणून पहिल्यांदाच उद्या (ता. १५) मुंबईत शक्ती प्रदर्शन करणार आहे.गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी होणाऱ्या या धडक मोर्चासाठी तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी शेकडो बागायतदार मुंबईकडे रवाना झाले.
मोर्चाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन यंदा कोकणातील विविध फलोत्पादनाची झालेली बिकट अवस्था त्यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न राहणार आहे. आंदोलनाला सर्वच विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळावा यासाठी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. कोकणातील आंदोलनाचे नेतृत्व प्रथमच पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या हाती असल्याने याच्या यशस्वीतेकडे शेतकऱ्यांच्या नजरा आहेत.
यंदा हापूस आंब्यासह काजू, कोकम आदी फळपिकांच्या एकूणच उत्पादनात घट झाल्याची शेतकऱ्यांची सामूहिक ओरड होती. अवकाळी पाऊस, कीडरोगांचा प्रादुर्भाव, प्रभावहीन कीटकनाशके, मोहोरातील नरफुलांची वाढती संख्या याबरोबरच सततचे बदलते वातावरण आदी काही कारणे सांगितली गेली. सुरुवातीला आंबा पिकाचे उत्पादन घटून आर्थिक संकटात सापडण्याची लक्षणे दिसू लागताच बागायतदारांनी प्राथमिक बोलावलेल्या बैठकीलाच शेतकऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. पहिल्याच बैठकीत बागायतदारांच्या भविष्यातील आर्थिक कोंडीची शक्यता वर्तवत यातून शासनाने बागायतदारांना सक्षम हात देण्याचा सूर निघाला. आजवर कोकणातील बागायतदार शेतकरी इतका हतबल कधी झाला नव्हता, आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे दरवाजे शेतकऱ्याने कधी ठोठावले नव्हते. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या मदतीला शासनाने धावून येणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करीत यातून शेतकऱ्यांच्या पदरी काहीतरी पडायचे असल्यास आता संघर्षाशिवाय पर्याय नसल्याचे विचार समोर आले. यातून तालुका पातळीवर ‘आंबा बागायतदार व व्यापारी संघ देवगड’ या शेतकरी संघटनेचा जन्म झाला. यातूनच शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा झाला. त्याला बागायतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने शेतकरी संघटन अधिक सक्षम होण्यास बळ मिळाले. मेळाव्यातूनच ओरोस येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मोर्चानंतर प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून बागायतदारांनी आपला रोष व्यक्त केला होता. पुढच्या टप्प्यात मुंबई-गोवा महामार्गावर आंदोलन छेडण्यात आले होते. फळपिकाच्या झालेल्या नुकसानीसाठी हेक्टरी सुमारे ५ लाख आंब्यासाठी व ३ लाख काजूसाठी नुकसान भरपाई देण्याची बागायतदारांनी सुरुवातीपासून मागणी लावून धरली होती.
वाशी फळबाजारात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात घाऊक आंबा व्यापारी आणि स्थानिक बागायतदार तसेच पुणे येथे कृषी आयुक्त कार्यालयात कीटकनाशके या अनुषंगाने राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात बैठका झाल्या. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने हेक्टरी सुमारे २२ हजारांची मदत शेतकऱ्यांसाठी जाहीर केली. मात्र ही जाहीर केलेली मदत अगदीच तुटपुंजी असल्याची ओरड झाली. कोकणातील आंबा व काजू बागायतदार शेतकरी हवालदिल झाला असताना केलेली मदत अपुरी असल्याने याचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता शेतकऱ्यांनी बोलून दाखवली. याच मागणीसाठी आता शुक्रवारी (ता. १५) कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांनी गिरगाव चौपाटी ते मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानावर धडक मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. याची तयारी पूर्ण झाली आहे. काही आंबा बागायतदार प्राथमिक नियोजनासाठीआधीच मुंबईत पोहोचले होते. आज शेकडो बागायतदार जिल्ह्यातून मुंबईकडे रवाना झाले.दुपारी ४ वाजता गिरगाव चौपाटी येथून धडक मोर्चाला प्रारंभ होणार असल्याने त्याआधी विविध व्यवस्थेतून बागायतदार शेतकरी मुंबईत पोहोचतील.
राज्याच्या राजधानीत कोकणातील बागायतदार इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा शक्ती प्रदर्शन करणार आहेत. सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा देऊन सहभागी व्हावे याकरिता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदींची मुंबईत भेट घेऊन सहकार्यासाठी साद घातली आहे. याचीच परिणीती म्हणून मोर्चा यशस्वीतेसाठी ठाकरे शिवसेनेच्या वतीने मुंबई, ठाणे, कल्याण परिसरातील कोकणवासीयांची तातडीची बैठक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने घेण्यात आली.शुक्रवारी मुंबईत होणाऱ्या बागायतदार शेतकऱ्यांच्या मोर्चाला स्थानिक आंबा, काजू उत्पादक तर सहभागी होणारच आहेत; परंतु त्यांच्या जोडीला मुंबईस्थित चाकरमान्यांनीही साथ देण्यासाठी साद घालण्यात आली आहे. यासाठीही बैठकांचा सिलसिला सुरू आहे. त्यामुळे मोर्चाच्या आंदोलनात चाकरमानी सहभागी होण्याची शक्यता वाढली आहे.

चौकट
कोकणात असंतोषाचे पेव
सुरुवातीला देवगडमध्ये संघर्षाची पडलेली ठिणगी कालांतराने पूर्ण जिल्हाभर पसरली. आंबा बागायतदारांच्या साथीला काजू उत्पादकही धावले. त्यामुळे मोर्चा, महामार्ग आंदोलनाची धार अधिक बळकट झाली. या संघर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरीही सहभागी झाले आणि संपूर्ण कोकणपट्ट्यात याचा वणवा पेटला. त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती वाढली आहे. हा धगधगता प्रवास आता मुंबईत मोर्चा काढण्यापर्यंत जाऊन पोहोचला आहे.
------------------
चौकट
असा आहे आंदोलनाचा प्रवास
८ फेब्रुवारी : स्थानिक बागायतदारांची प्राथमिक बैठक
१८ फेब्रुवारी: शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत बागायतदार मेळावा
१२ मार्च : ओरोस येथे शेतकरी मोर्चा
२३ मार्च : महामार्ग आंदोलन
२ एप्रिल : वाशी फळबाजारात आंबा व्यापाऱ्यांसोबत बैठक
९ एप्रिल : पुणे येथे कृषी आयुक्तांसोबत बैठक
११ एप्रिल : शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत बागायतदार मेळावा
१६ एप्रिल : विविध राजकीय नेत्यांच्या मुंबईत गाठीभेटी घेण्यास प्रारंभ
१५ मे : गिरगाव चौपाटी ते वर्षा निवासस्थान असा धडक मोर्चा
--------------------

कोट
कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाने तुटपुंजी मदत जाहीर करून निराशा केली आहे. यामुळे अस्वस्थ असलेल्या बागायतदारांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शुक्रवारी (ता. १५) धडक मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. याचे नेतृत्व शेतकरी नेते राजू शेट्टी करणार आहेत. या अनुषंगाने विविध राजकीय पक्षांच्या नेतेमंडळींची मुंबईत भेट घेऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्याची साद घातली आहे. चाकरमानीही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. जिल्ह्यातील आंबा, काजू उत्पादकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊन कोकणची ताकद दाखवावी.
- आनंद उर्फ काका ढोके, आंबा बागायतदार व व्यापारी संघ, देवगड.
---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi ला टीम इंडियात संधी मिळाली, LSG च्या संजीव गोएंका यांची पोस्ट व्हायरल! म्हणतात, देश आश्चर्याने पाहत आहे...

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात; पण रक्कम पाहून महिलांना बसला धक्का!

Pune DPC Meet: प्रशासकीय खर्च कपातीसाठी पुण्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक ऑनलाइन; मोदींच्या आवाहनानुसार तातडीने अंमलबजावणी

ZP School Teacher Crisis : नविन शैक्षणिक वर्षात तरी शिक्षक मिळेल का? टाकळी राजेराय प्रशालेत शिक्षकांच्या कमी मुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान

HBA Interest Rate: घर खरेदी-बांधणीसाठी स्वस्त कर्जाचा फायदा कायम! HBA व्याजदरात वाढ नाही; सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT