देवरुखात आज
समाधान शिबिर
देवरूख ः महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत महसूल समाधान शिबिर अभियानांतर्गत संगमेश्वर तालुक्यातील नागरिकांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शुक्रवारी (ता. १५) सकाळी ११ वाजता देवरूख येथील ओमेगा गार्डन हॉल येथे होणार आहे. शिबिरामध्ये नागरिकांना महसूल विभागाशी संबंधित विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यात डिजिटल ७/१२ आणि ८अ उतारे, विविध दाखले व प्रमाणपत्रे, प्रलंबित फेरफार प्रकरणांचा निपटारा, अभिलेख दुरुस्ती हेल्पडेस्क तसेच अकृषक (NA) रूपांतरणासंदर्भातील मार्गदर्शन अशा अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या शिबिरात तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठी हे सर्व अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी आणि प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहेत.
नूतन विद्यामंदिरात
दहावीच्या वर्गास मान्यता
मंडणगड ः तालुक्यातील नूतन विद्यामंदिरमध्ये मराठी माध्यमाचा दहावीचा वर्ग सुरू करण्याची मान्यता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने दिली आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षण अभ्यासक्रमाचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. पायाभूत सुविधांनी सज्ज असलेल्या या प्रशालेची जिल्हा परिषदेने मॉडेल स्कूल म्हणून निवड केल्याने पहिली ते चौथी अशी प्राथमिक शिक्षणाची सोय उपलब्ध असलेल्या या प्रशालेत प्रथम पाचवी ते सातवी हे पूर्ण प्राथमिक शिक्षण देणारे वर्ग जोडले गेले. बदलत्या परिस्थितीत आठवी व नववी आता दहावीचा वर्ग सुरू करण्याचा मार्ग खुला झाला आहे.
पुरवणी परीक्षा
जून-जुलै मध्ये होणार
रत्नागिरी ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलै २०२६ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) पुरवणी परीक्षा तसेच प्रात्यक्षिक परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले आहे. राज्य मंडळाच्या कोकण विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा घेण्यात येणार आहेत. जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार बारावीची लेखी परीक्षा २६ जून ते ८ जुलै २०२६ या कालावधीत होणार असून दहावीची लेखी परीक्षा २६ जून ते ३० जून २०२६ दरम्यान होईल. तसेच प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा देखील याच कालावधीत पार पडणार आहेत. मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकांची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असेल. त्या छापील वेळापत्रकावरूनच परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी.
छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन
रत्नागिरी ः छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनीही महाराजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.