- rat१५p३.jpg-
26O43543
चिपळूण ः येथील पूलाचे काम कूर्म गतीने सुरू आहे.
मुंबई-गोवा महामार्गावर विलंबाचा खेळ
शौकत मुकादम ः ‘त्या’ अधिकाऱ्यांवर कारवाई करा, केंद्रीय मंत्री गडकरी यांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या १७ वर्षांपासून रखडले असून, यामुळे झालेल्या अपघातांत अनेकांना नाहक प्राण गमवावे लागले आहेत. या विलंबाला राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी जबाबदार असून, ते मंत्र्यांना कामाच्या पूर्ततेबाबत खोटी माहिती देत आहेत. चुकीची माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्या अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी सभापती शौकत मुकादम यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शौकत मुकादम यांनी निवेदनात म्हटले आहे की, महामार्गाच्या कामाबाबत संबंधित अधिकारी मंत्र्यांना केवळ तारखेवर तारखा देत आहेत. या अधिकाऱ्यांनी दिलेल्या खोट्या माहितीमुळे मंत्री महोदय कामाच्या पूर्णत्वाच्या घोषणा करतात, मात्र प्रत्यक्षात काम वेळेत पूर्ण होत नाही. कामात अनेक ठेकेदार बदलले गेले, तरीही परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ठेकेदारांवर वचक नसल्यानेच हा खेळ सुरू असल्याचा आरोप मुकादम यांनी केला आहे.
महामार्गाच्या रचनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना मुकादम म्हणाले, ‘मुंबई-गोवा महामार्गावर जितकी वळणे आहेत, तितकी महाराष्ट्रात इतर कोणत्याही महामार्गावर नाहीत. याशिवाय, कळंबस्ते बौद्धवाडी येथील रेल्वे क्रॉसिंगवर पुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. पावसाळा तोंडावर असल्याने या भागात एकेरी वाहतुकीमुळे मोठी कोंडी आणि अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे.’
----
रस्ता खाली आणि गटारी उंच
कोकणातील भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता काम केले जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. महामार्गालगतची गटारे रस्त्यापेक्षा उंच बांधण्यात आली आहेत. यामुळे डोंगरावरून येणारे पावसाचे पाणी रस्त्यावरच साठून राहते. या गंभीर समस्येवर अद्याप कोणतीही उपाययोजना केलेली नाही.
--------
कोट
अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमतामुळे जनतेचा जीव धोक्यात आला आहे. केंद्रीय मंत्र्यांनी आता ठोस पावले उचलून दोषींवर नियमानुसार कारवाई करावी, तरच या कामाला गती मिळेल.
- शौकत मुकादम, माजी सभापती.
---
हा भाग आहे अपूर्ण
मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरणाचे काम गेल्या १५ वर्षांहून अधिक काळ रखडले असून, एप्रिल २०२६ पर्यंत ते ९७ टक्के पूर्ण झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. अद्यापही चिपळूण, संगमेश्वर, पाली, हातखंबा येथील उड्डाणपुलाची कामे अपूर्ण आहेत. तसेच माणगाव-इंदापूर बायपासचे काम अपूर्ण आहे.
---
या अडचणींचा सामना करावा लागतो
कामे अपूर्ण असल्यामुळे संगमेश्वर बसस्थानकाजवळ सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर पाली येथे आठवडा बाजाराच्या दिवशी नागरिकांची गैरसोय होते. पादचाऱ्यांना चालणे कठीण जाते. काहीवेळा किरकोळ अपघातही होत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.