पी-फासविरोधी लढ्याला बळ
स्वाक्षरी मोहीम ; ओंकार भोजने यांचा पाठिंबा
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ ः लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीत प्रस्तावित असलेल्या पी-फास या रसायनाच्या उत्पादनाला चिपळूणकरांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. कोकण पर्यावरण संघर्ष समितीच्या वतीने सुरू असलेल्या स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभत असून, मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी अभिनेता ओंकार भोजने याने भेट देऊन पाठिंबा जाहीर केला आहे.
चिपळूण शहरात सुरू असलेल्या मोहिमेच्या ठिकाणी भेट देऊन ओंकार भोजने याने स्वतः स्वाक्षरी केली आणि समितीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. यावेळी बोलताना तो म्हणाला, ‘पी-फाससारख्या घातक रसायनामुळे आपल्या पर्यावरण आणि आरोग्यावर होणारे परिणाम चिंताजनक आहेत. आपले भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी ज्येष्ठ मंडळी आणि पर्यावरणप्रेमी जो लढा देत आहेत, तो कौतुकास्पद आहे. या लढ्यात मी आपल्यासोबत आहे.’
कोकण पर्यावरण संघर्ष समितीच्या माध्यमातून ही मोहीम आता घराघरात पोहोचत आहे. चिपळूणमधील व्यापारी, विद्यार्थी आणि मान्यवरांनी यात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला आहे. शासनाने जनभावना लक्षात घेऊन हा घातक प्रकल्प तत्काळ रद्द करावा, अन्यथा आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.