कोकण

कोकण विधान परिषदेच्या जागेवरुन महायुतीत पेच

CD

O43620

कोकण विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत पेच
गुरू-शिष्य येणार आमने-सामने; शिंदे शिवसेनेसह राष्ट्रवादीत चढाओढ
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या रिक्त जागेसाठी लवकरच निवडणूक होणार आहे. यापूर्वी या जागेचे प्रतिनिधित्व खासदार सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांनी केले होते. मात्र, आता राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे आणि कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पक्षनिहाय संख्याबळ पाहता, या निवडणुकीत चुरस पाहायला मिळणार आहे. विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या तीन जिल्ह्यांमध्ये शिवसेनेने (शिंदे गट) वर्चस्व वाढवले आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेने आपल्याकडे राखण्यासाठी प्रयत्न सुरू केले, तर महायुतीत या जागेवरून मोठा पेच निर्माण होणार आहे.
कोकण विभागात या मतदारसंघात शिवसेनेचे पारडे जड आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांतील स्थानिक स्वराज्य संस्था मिळून एकूण ८३१ मतदार (सदस्य) आहेत. यामध्ये एकट्या शिवसेनेच्या (शिंदे गट) सदस्यांची संख्या २८९ वर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत, ज्या पक्षाकडे सर्वाधिक संख्याबळ आहे, त्याच पक्षाचा उमेदवार विधान परिषदेवर जावा, असा दावा शिवसेनेकडून केला जात आहे. या निवडणुकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ''गुरू-शिष्यांची'' राजकीय लढाई. खासदार सुनील तटकरे हे मंत्री उदय सामंत यांचे राजकीय गुरू मानले जातात. मात्र, आता राजकीय अस्तित्वाची वेळ आल्यावर उदय सामंत आपल्या शिवसेनेसाठी ही जागा पदरात पाडून घेण्यात यशस्वी होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुनील तटकरे आपल्या मुलासाठी पुन्हा एकदा आग्रही राहणार हे निश्चित मानले जात आहे; परंतु शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही वाढलेल्या संख्याबळाच्या जोरावर आपला हक्क सांगण्यास सुरुवात केल्याची अंतर्गत चर्चा सुरू आहे.
त्यामुळे महायुतीत या जागेवरून मोठा पेच निर्माण होऊ शकतो. अनिकेत तटकरे यांनी यापूर्वी या मतदारसंघाचे नेतृत्व केले असले तरी, आता जिल्हा परिषद, नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये शिवसेनेने मिळवलेले यश राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरू शकते. कोकणात उदय सामंत यांनी ज्या पद्धतीने पक्षाची बांधणी केली आहे, त्यातून शिवसेनेने भाजपला मागे सारत सर्वाधिक संख्याबळ गाठले आहे. आता हाच आकडा विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी शिवसेनेचे मुख्य हत्यार ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर, कोकणच्या या राजकीय आखाड्यात गुरू वरचढ ठरतात की शिष्याची रणनीती यशस्वी होते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

चौकट १
असे संख्याबळ
कोकण विभागात शिंदे शिवसेनेचे २८९ सदस्य आहेत. त्यात जिल्हा परिषद सदस्य ७७, पंचायत समिती सभापती १८ आणि नगरपालिका सदस्य १३२ आहेत. तर भाजपचे संख्याबळ २८५ असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) सदस्यांची संख्या केवळ १०६ इतकी मर्यादित आहे.

ब्युटी पार्लरमध्ये मार्गदर्शन, पुण्यात विशेष कोचिंग अन्... NEET पेपरफुटीचा ‘मास्टरमाईंड’ पी. व्ही. कुलकर्णी नेमका कोण?

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मोठा अपघात; तीन मालवाहतूक ट्रक पलटले; वाहतूक ठप्प!

LSG vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सचे खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून का उतरले? कारण जाणून CSK चे फॅन असल्याचा वाटेल अभिमान...

कल्याण-डोंबिवलीत आरोग्य क्षेत्रात मोठी झेप! अत्याधुनिक ५०० खाटांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारणार, केडीएमसीचा निर्णय

Pune News : थकीत पगारामुळे सिंहगड संस्थेतील सुरक्षा रक्षकाने गळफास घेत संपविले जीवन; संस्थेविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT