''पक्षी अभयारण्य'' म्हणून
रत्नागिरी जिल्ह्याला ओळख द्या
हेल्थ इंडिया फाउंडेशनची मागणी ; वनमंत्री आणि वनसचिवांना निवेदन
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १५ : वाढते तापमान, बेसुमार जंगलतोड आणि निसर्गाचा बिघडलेला समतोल रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय वनक्षेत्रात वाढ करावी, अशी मागणी चिपळूणच्या हेल्थ इंडिया फाउंडेशनने केली आहे. जिल्ह्याची ओळख ''पक्षी अभयारण्य'' पर्यटन स्थळ म्हणून विकसित केल्यास पर्यावरणासोबतच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही गती मिळेल, असे निवेदनात म्हटले आहे.
जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी सरासरी ३५ अंश सेल्सिअस असणारे तापमान आता ३८ अंशांच्या पुढे गेले आहे. सातत्याने होणारी जंगलतोड आणि निसर्गातील मानवी हस्तक्षेपामुळे जैवविविधतेची मोठी हानी होत असल्याचे संस्थेने निदर्शनास आणून दिले आहे. ही परिस्थिती रोखण्यासाठी वनक्षेत्र वाढवणे हाच एकमेव पर्याय असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गसंपदा पक्षी निरीक्षकांसाठी नंदनवन आहे. जिल्ह्यात २५० हून अधिक पक्षी प्रजाती आढळतात. तिबोटी खंड्या, निळ्या कानाचा खंड्या, महाधनेश आणि बेडूकतोंड्या यांसारखे जागतिक स्तरावर दुर्मीळ मानले जाणारे पक्षी येथे पहायला मिळतात. चिपळूणमधील वालोपे, गणेश खिंड, दसपटी तसेच संगमेश्वरमधील शास्त्री नदी आणि मार्लेश्वर परिसरात पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य आहे. हे लक्षात घेऊन पक्षी अभयारण्य ही संकल्पना प्रत्यक्षात आणली तर त्याचा निश्चितच फायदा होईल. रत्नागिरी जिल्ह्याची ओळख केवळ हापूस आणि निसर्गापुरती मर्यादित न ठेवता ''पक्षी अभयारण्य'' म्हणून जागतिक नकाशावर आणल्यास पर्यावरण संवर्धनासह पर्यटनाला मोठी चालना मिळेल, असे हेल्थ इंडिया फाउंडेशनने दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. हे निवेदन राज्याचे वनमंत्री आणि वनसचिव यांना पाठवण्यात आले आहे.
चौकट
शासकीय वनक्षेत्र वाढवण्याची गरज
जिल्ह्यात सध्या केवळ २ टक्केच शासकीय वनक्षेत्र आहे, तर मोठा भाग खासगी मालकीचा आहे. अनेक खासगी जमिनी पडीक असून त्या वन विकासासाठी शासनाने ताब्यात घेतल्यास मोठे पक्षी अभयारण्य उभारता येईल. यामुळे जमिनीची धूप रोखणे, वन्यजीवांसाठी पाणवठ्यांची निर्मिती आणि दुर्मीळ वनस्पतींचे संरक्षण करणे शक्य होईल, असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.