swt1522.jpg
43646
सिंधुदुर्गनगरी : नारीशक्ती विधेयकाला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा निषेध करताना जिल्हा परिषदेचे सत्ताधारी भाजप, शिवसेनेचे सदस्य व पदाधिकारी.
जिल्हा परिषद अंदाजपत्रक ३० कोटी पार
पहिल्यांदाच मोठी तरतूद : जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला आता बळकटी
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १५ : जिल्ह्याच्या ग्रामीण विकासाला आता बळकटी मिळणार आहे. जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच ३० कोटींच्या पुढे जिल्हा परिषदेचे बजेट गेले आहे. दुपारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत तब्बल १९ कोटी ५२ लाख १९ हजार ३४५ रुपयांच्या सुधारित वाढ असलेल्या अंदाजपत्रकासह ३४ कोटी ३४ लाख १९ हजार ३४५ रुपयांचे २०२६-२७ चे सुधारित अंदाजपत्रक वित्त सभापती संतोष साटविलकर यांनी सभागृहात मांडले. त्याला सभागृहाने एकमुखी मंजुरी दिली.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची विशेष सभा आज दुपारी जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, उपाध्यक्ष तुकाराम साईल, विषय समिती सभापती संतोष साटविलकर, प्रितेश राऊळ, अनुराधा नारकर, रोहिता तांबे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक उदय पाटील तसेच सभा सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांच्यासह सदस्य अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सभेच्या सुरुवातीला दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थी, सिंधुरत्न योजनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने पालकमंत्री नितेश राणे, राज्यसभा खासदार विनोद तावडे, विधान परिषद आ प्रमोद जठार, राज्य पणन महामंडळावर निवड झाल्याने कृषी उत्पन्न समितीचे अध्यक्ष तुळशीदास रावराणे यांचे अभिनंदन ठराव घेण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे वित्त सभापती संतोष साटविलकर यांनी मूळ अंदाजपत्रकाच्या दुप्पतीपेक्षा जास्त वाढ असणारे जिल्हा परिषदेचे २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे बजेट सभागृहात सादर केले. ३४ कोटी ३४ लाख १९ हजार ३४५ रुपये खर्चाचे हे अंदाजपत्रक आहे. या वर्षीचे मूळ अंदाजपत्रक १४ कोटी ७२ लाख ८ हजार ६०० रुपये खर्चाचे होते. मात्र, आज सादर केलेल्या सुधारित अर्थसंकल्पात घसघशीत वाढ दिसून आली. जिल्ह्यातील नगर परिषदांपेक्षा कमी बजेट जिल्हा परिषदेचे होते. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन सर्वजण करीत होते. परंतु आज जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच ३० कोटींच्या पुढे अंदाजपत्रक पोहोचले आहे. ही वाढ जिल्ह्याच्या ग्रामीण विकासासाठी विश्वास देणारी असल्याने सभागृहाने वित्त सभापती संतोष साटविलकर यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी जिल्हा परिषदेच्या विकासकामांच्या पुरवणी आराखड्याला मंजुरी देण्यात आली. परंतु अजून काही सदस्यांना या आराखड्यात कामे समाविष्ट करावयाची असल्यास २२ मे २०२६ पर्यंत आपल्याकडे देण्याचे आवाहन सभाध्यक्ष कामत यांनी केले.
यावेळी नारीशक्ती विधेयकावर चर्चा करण्यासाठी विषय अजेंठ्यावर ठेवण्यात आला होता. यावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष तथा विद्यमान सदस्य सुमेधा पाताडे आणि कणकवली सभापती हर्षदा वाळके यांनी चर्चा केली.
चौकट
मान्सून लांबण्याची शक्यता
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी, एल निनो नावाचे संकट घोंगावत आहे. एल निनो म्हणजे समुद्रातील पाणी गरम होऊन आपल्या जिल्ह्याकडे पाऊस येण्याचा प्रवाह बदलून तो दक्षिण आफ्रिका देशाकडे सरकणार आहे. यामुळे यावर्षी मान्सून लांबण्याची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात पावसाळा संपण्याची शक्यता आहे. पावसाविना कोरडे दिवस जास्त दिवस जाणार आहेत. याबाबत पालकमंत्री नीतेश राणे यांनीही जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन केले आहे. जिल्हा परिषद सदस्यांनीही याबाबत जागृत राहावे, असे आवाहन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.