‘उद्योजकांनी कर्ज
योजनेचा लाभ घ्या’
रत्नागिरी, ता. ५ ः विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांना आर्थिक बळ देण्यासाठी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे विविध कर्ज योजना राबवण्यात येत आहेत. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर. एस. नरवडे यांनी केले आहे. उद्योजकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी या योजना अत्यंत फायदेशीर ठरणार आहेत. यामध्ये १ लाखापर्यंत थेट कर्ज मिळू शकते, २५ टक्के बीज भांडवल, वैयक्तिक कर्ज १० लाखांपर्यंत, गट कर्ज व्याज परतावा योजनेतून १० लाख ते जास्तीत जास्त ५० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. जिल्ह्यातील जास्तीत जास्त तरुण उद्योजकांनी या संधीचा फायदा घेऊन आपले व्यवसाय यशस्वीपणे उभारावेत, असे आवाहन महामंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
‘ढाई आखर’ पत्रलेखन स्पर्धा
रत्नागिरी ः भारतीय टपाल विभागाच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय स्तरावरील ''ढाई आखर’ पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी पृथ्वीमातेला एक पत्र ः निसर्गाचे रक्षण करण्याचे माझे वचन (A Letter to Mother Earth: My Promise to Protect Nature) या मध्यवर्ती संकल्पनेवर ही स्पर्धा होणार असून, जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी आणि नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन डाकघर अधीक्षक अ. द. सरंगले यांनी केले आहे. सध्याच्या वाढत्या डिजिटल युगात पत्रलेखनाची कला काहीशी मागे पडली असली तरी, पत्रांचे भावनिक महत्त्व आजही अबाधित आहे. नागरिकांना आपले विचार, कल्पना आणि लेखन कौशल्य व्यक्त करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने टपाल विभागातर्फे २०१७ पासून ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. यंदा ही स्पर्धा १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पार पडणार आहे. या स्पर्धेत कोणताही भारतीय नागरिक या स्पर्धेत भाग घेऊ शकतो. हे पत्र मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा कोणत्याही स्थानिक भाषेत लिहिता येईल. या स्पर्धेसाठी अंतर्देशीय पत्र किंवा पोस्टाचा साधा लखोटा वापरणे बंधनकारक आहे. अंतर्देशीय पत्रासाठी शब्दमर्यादा ५०० शब्द आणि ए-४ (A४) साईज कागदासाठी (लखोट्यातून पाठवण्यासाठी) शब्दमर्यादा १ हजार शब्द आहे. ही स्पर्धा १८ वर्षांपर्यंत आणि १८ वर्षांवरील अशा दोन गटात होईल. या स्पर्धेतील विजेत्यांना सर्कल (राज्य) आणि राष्ट्रीय स्तरावर रोख बक्षिसे दिली जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.