Rat5p13.jpg-
55389
मंडणगड ः वेरळ येथे चारसुत्री पद्धतीने भाताची लावणी करताना भरारी महिला शेतकरी गटाच्या महिला.
--------------
महिलांच्या एकीने बहरली सामूहिक शेती
वेरळतर्फे नातूचा भरारी महिला गट; पडीक जमिनीला दिले नवजीवन
सचिन माळी ; सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ५ : तालुक्यातील वेरळतर्फे नातू गावातील भरारी महिला शेतकरी उत्पादक गटाने सुमारे दहा एकर पडीक जमिनीवर सामूहिक शेतीचा यशस्वी प्रयोग राबवून महिला सक्षमीकरणाचा आदर्श निर्माण केला आहे. श्रम, नियोजन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि परस्पर सहकार्याच्या बळावर या महिलांनी शेतीला नवी दिशा दिली असून, त्यांचा हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. नाम फाउंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेत त्यांनी सहभाग घेतला आहे.
कृषी विभाग, उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशनच्या सहकार्याने या महिला गटाची स्थापना झाली. सुरवातीला काही महिलांनी एकत्र येऊन पडीक जमिनीवर शेती करण्याचा निर्धार केला. आज या गटात १५ महिला सहभागी असून, त्यामध्ये ज्येष्ठ महिलांचाही सक्रिय सहभाग आहे. वयाची अडचण न मानता महिलांनी श्रम आणि चिकाटीच्या बळावर शेतीला नवे रूप दिले आहे. गावातील विखुरलेल्या पडीक जमिनी एकत्र करून सामूहिक शेतीची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात आली. भाजावळ या पारंपरिक कष्टप्रद पद्धतीला छेद देत थेट गादी वाफ्यांवर कावेरी चिंटू, वाडा कोलम, अंकूर पूजा, अंकूर रूपाली बियाणांची पेरणी केली. सेंद्रिय शेती, जैविक कीड व्यवस्थापन, मृदासंवर्धन, जीवामृत, चिकट सापळे अशा आधुनिक कृषी पद्धतींचा अवलंब केल्याने पिकांची वाढ जोमाने झाली. पॉवरटिलरने चिखलणी करून ८० टक्के क्षेत्रावर चारसुत्री पद्धतीने लावणी पूर्ण केली आहे.
परस्पर सहकार्य, नियोजन आणि जबाबदारीची भावना यामुळे हा उपक्रम केवळ शेतीपुरता मर्यादित न राहता सामाजिक परिवर्तनाचे माध्यम ठरत आहे. उमेदच्या समिधा सापटे, सहाय्यक कृषी अधिकारी स्वप्नील चेके, निमंत्रक स्नेहल गुजर, किमया जोशी, दीपाली महाजन, चंद्रभागा शिंदे, जयवंती पांढरे, मोहिनी पिंपळकर, निकिती मुडचावडे, प्रणाली खामकर, साक्षी साळवी, सारिका जाधव, सावित्री पिंपळकर, शारदा जाधव, सुजाता आंबडस्कर, सुनीता दुसार, सुनीता खामकर यांचा सहभाग आहे.
चौकट
नव्या तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ
कृषीतज्ज्ञांशी नियमित व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून महिलांना नव्या तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन देतात. प्रत्यक्ष शेतात काम करताना उद्भवणाऱ्या समस्यांवर तत्काळ उपाय मिळत असल्याने उत्पादनक्षमतेत वाढ झाली आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेती अधिक सक्षम करण्याचा आदर्श घालून दिला आहे.
चौकट
हिरवीगार शेती गावाची नवी ओळख
महिलांच्या श्रमातून उभी राहिलेली ही हिरवीगार शेती वेरळतर्फे नातू गावाची नवी ओळख बनली आहे. पडीक जमिनीला उत्पादनक्षम बनवताना महिलांनी समाजासमोर एक आदर्श उभा केला असून, महिला सक्षमीकरण आणि शाश्वत शेतीचा हा प्रयोग निश्चितच अनुकरणीय ठरत आहे.
चौकट
गीतांच्या सुरांनी श्रम हलके
भरारी महिला शेतीगटातील महिला हसतखेळत, पारंपरिक ओव्या आणि गाणी म्हणत श्रमाला उत्सवाचे रूप देतात. कष्टाचे ओझे न मानता आनंदाने काम करण्याची त्यांची पद्धत पाहणाऱ्यांनाही प्रेरणा देणारी ठरते. शेतात घुमणाऱ्या गीतांच्या सुरांनी श्रम हलके होतात आणि एकोप्याची भावना अधिक दृढ होत असल्याचे पाहायला मिळते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.