- rat५p२०.jpg-
26O55443
किरबेटमध्ये गव्यांचा धुमाकूळ.
----
किरबेट परिसरात गव्यांंचा धुमाकूळ
१४ शेतकऱ्यांचे नुकसान ; ग्रामस्थांमध्ये नाराजी
सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ५ ः संगमेश्वर तालुक्यातील किरबेट येथे गव्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत तब्बल १४ शेतकऱ्यांच्या भातशेतीचे अतोनात नुकसान केले आहे. ३ आणि ४ ऑगस्ट रोजी गव्यांच्या कळपाने शेतात घुसून लावणी केलेले भात तुडवून नष्ट केले. यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने स्थानिक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
यंदा भातलावणीच्या काळात पावसाने हुलकावणी दिल्याने किरबेटमधील शेतकऱ्यांनी अत्यंत कष्टाने आणि पंपाच्या साहाय्याने पाणी देऊन भातलावणी केली होती; मात्र, गव्यांच्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
एकीकडे नैसर्गिक अन् वन्यजीवांच्या संकटाचा सामना करावा लागत असताना, दुसरीकडे कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांची उपेक्षा होत आहे. कृषी कर्मचारी गावात कधीतरीच फेरफटका मारतात आणि शेतीविषयक कोणतेही समाधानकारक मार्गदर्शन किंवा सल्ला देत नाहीत, असा थेट आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे. कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या निष्क्रियतेमुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. गव्यांच्या या उपद्रवामुळे राजेंद्र जायगडे, सदानंद चाळके, पांडुरंग जायगडे, अनंत पांचाळ, शरद कांबळे, आत्माराम कांबळे, अशोक कांबळे, सुनील अंकुशराव, संजय जायगडे, संजय कांबळे, प्रकाश जायगडे, महेश जायगडे, प्रकाश सुर्वे आणि महेंद्र लाखन या १४ शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.
---
गव्यांचा बंदोबस्त करा
वनविभागाने या परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या गव्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा तसेच नुकसानग्रस्त शेतीचा तातडीने पंचनामा करून पीडित शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी किरबेट येथील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.