कासव संवर्धनाविषयी
डीजीकेमध्ये व्याख्यान
रत्नागिरी : देव, घैसास, कीर कला, वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात प्राणिशास्त्र विभागाच्यावतीने कासव संवर्धन या विषयावर कांदळवन कक्षाचे स्वस्तिक गावडे यांनी व्याख्यान दिले. त्यांनी कासव संवर्धनावर आधारित सादरीकरणाद्वारे कासवांच्या विविध प्रजाती, महाराष्ट्रात आढळणाऱ्या कासवांच्या प्रजाती, नैसर्गिक व मानवनिर्मित घरटी तसेच कासव संवर्धनाची कार्यपद्धती या विषयी सविस्तर माहिती दिली. शासन आणि विविध स्वयंसेवी संस्थांकडून राबवण्यात येणारे कासव संवर्धन प्रकल्प, समुद्रकिनारी गावांमधील स्थानिकांना दिले जाणारे प्रशिक्षण तसेच कासव महोत्सवाचे महत्त्व या विषयीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी गावडे यांच्याशी संवाद साधून शंकांचे निरसन करून घेतले. विद्यार्थ्यांनी या सत्रात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्रा. सानिका कीर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सिद्धी कदम यांनी आभार मानले.
१३ ई-कॉमर्स मॉडेल्स
सावर्डेत सादर
सावर्डे ः सावर्डे येथील कला व विज्ञान महाविद्यालयातर्फे जागतिक कॉमर्स डे निमित्त विद्यार्थ्यांनी आधुनिक व्यापार, तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांवर आधारित एकूण १३ ई-कॉमर्स मॉडेल्स सादर केली. प्रदर्शनामध्ये ई-कॉमर्स, नेटवर्किंग, डिजिटल पेमेंट प्रणाली, बिझनेस मॉडेल्स, एआय रिटेल स्टोअर, ई-मॉल आदी विषयांवरील मॉडेल्सचा समावेश होता. बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी, आधुनिक व्यावसायिक संकल्पना सहज समजाव्यात आणि डिजिटल व्यवहारांविषयी जनजागृती व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बदलत्या जागतिक धोरणांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच कौशल्याधारित शिक्षण, डिजिटल ज्ञान आणि रोजगार निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा सातत्याने विकास करण्याचे आवाहन केले.
राज्यस्तरीय क्रिकेट
स्पर्धेसाठी तिघांची निवड
रत्नागिरी : सौ. गोदूताई जांभेकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्रिकेट क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित निवड चाचणीत विद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली. यात नयन आंबेकर, अनुराग सनगरे आणि शिवतेज धुळप यांचा समावेश आहे. ही स्पर्धा राहुरी (अहिल्यानगर) येथे २३ व २४ ऑगस्टला होणार आहे. या विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक महेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शालेय समितीचे अध्यक्ष राजन मलुष्टे, संस्थेचे मुख्याध्यापिका संजना तारी आदींनी अभिनंदन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.