अंतराळाच्या अंतरंगी -------------लोगो
(२६ जुलै पान ६)
रत्नागिरीतील ‘तारांगण’ ही
विद्यार्थ्यांसाठी पर्वणीच
मानवी मनात लहानपणापासूनच आकाशाविषयी, चंद्र-तारे, सूर्य आणि अथांग विश्वाबद्दल एक नैसर्गिक आकर्षण व कुतूहल असते. अथांग विश्वाचे गूढ उकलण्याची मानवी धडपड शतकानुशतके सुरू आहे आणि लहान वयातील कुतूहल हीच या शोधाची पहिली पायरी असते. ‘रात्री ताऱ्यांनी भरलेले आकाश कसे दिसते?’, ‘दिवस आणि रात्र का होतात?’ किंवा ‘चंद्र आपला आकार का बदलतो?’ यांसारखे अनेक प्रश्न प्रत्येक बालमनात निर्माण होतात. खगोलशास्त्र (ॲस्ट्रोनॉमी) हे मानवाला लाभलेले सर्वात जुने आणि समृद्ध विज्ञान मानले जाते. शालेय वयातच मुलांच्या या नैसर्गिक जिज्ञासेला योग्य दिशा मिळाली तर त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची भक्कम पायाभरणी होऊ शकते म्हणूनच आधुनिक शिक्षणव्यवस्थेत शालेय अभ्यासक्रमात खगोलशास्त्राचा समावेश करणे आणि प्रात्यक्षिक स्वरूपात ते शिकवणे, ही काळाची गरज बनली आहे.
rat८p१२.jpg -
26O56037
- प्रा. बाबासाहेब सुतार, रत्नागिरी
---
शालेय शिक्षणात खगोलशास्त्राचे स्थान अत्यंत अनन्यसाधारण आहे. हे केवळ ग्रहांची आणि ताऱ्यांची नावे पाठ करण्याचे शास्त्र नसून, ते विद्यार्थ्यांना तर्कशुद्ध विचार करायला आणि मूलभूत प्रश्न विचारायला शिकवते. विज्ञानाची खरी सुरुवात निरीक्षणातून होते आणि आकाश हे निरीक्षणासाठी उपलब्ध असलेले सर्वात मोठे उघडे दालन आहे. खगोलशास्त्र हा असा विषय आहे जो इतर अनेक शालेय विषयांना सहजपणे एकमेकांशी जोडतो. उदाहरणार्थ, भौतिकशास्त्रातील (फिजिक्स) प्रकाश, गुरूत्वाकर्षण, गतीचे नियम आणि ऊर्जा या संकल्पना अंतराळातील घटनांमधून समजणे सोपे जाते. गणितातील (मॅथमॅटिक्स) अंतर, आकारमान, कोन आणि वेळ यांची गणिते ग्रहांच्या कक्षेचा अभ्यास करताना मुलांच्या सहज लक्षात येतात. तसेच भूगोलातील (जिओग्राफी) पृथ्वीची रचना, ऋतूचक्र, भरती-ओहोटी, अक्षवृत्त आणि रेखांशसारख्या संकल्पना आकाशाच्या अभ्यासाने अधिक स्पष्ट होतात. या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांमध्ये तार्किक विचारक्षमता, प्रश्न विचारण्याची सवय आणि समस्या निवारणाचे कौशल्य विकसित होते.
या व्यतिरिक्त, आपल्या समाजात आजही ग्रहण, धूमकेतूचे आगमन किंवा ग्रहांच्या स्थितीवरून अनेक अंधश्रद्धा आणि भीती पसरलेली दिसते. शालेयस्तरावरच जर विद्यार्थ्यांना या खगोलीय घटनांमागील शास्त्रीय कारणे समजली तर समाजात अंधश्रद्धाळू नसलेली, विवेकवादी आणि तर्कशुद्ध विचार करणारी सुजाण पिढी घडेल. दुर्बीण (टेलिस्कोप) किंवा साध्या डोळ्यांनी आकाशनिरीक्षण केल्याने मुलांमध्ये एकाग्रता, चिकाटी आणि सूक्ष्म निरीक्षण कौशल्य वाढते. आजच्या आधुनिक युगात इस्रो आणि नासासारख्या संस्थांच्या जागतिक कामगिरीमुळे अंतराळ संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या अथांग संधी निर्माण होत आहेत. शालेय वयात खगोलशास्त्राची आवड निर्माण झाल्यास भविष्यात उत्तम अंतराळ शास्त्रज्ञ, डाटा विश्लेषक किंवा इंजिनिअर्स तयार होण्यास मदत होईल. तसेच, अथांग विश्वात आपली पृथ्वी हा एक अतिशय लहान; पण जीवसृष्टी असलेला एकमेव अद्वितीय ग्रह आहे, ही जाणीव झाल्यामुळे मुलांमध्ये निसर्ग आणि पर्यावरणाविषयी संवेदनशील भावना विकसित होते.
खगोलशास्त्राचे हे व्यापक महत्त्व ओळखून महाराष्ट्राच्या राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने (बालभारती) पाचवीपासूनच्या शालेय अभ्यासक्रमात खगोल आणि अवकाशविषयक घटकांचा समावेश करून एक अतिशय क्रांतिकारक आणि कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. लहान वयातच विद्यार्थ्यांना विश्वाच्या या अद्भूत जगाची ओळख करून देणे, ही काळाची गरज होती. सर्वात महत्त्वाची आणि अभिनंदनीय बाब म्हणजे हे धडे केवळ पुस्तकी माहितीपुरते मर्यादित नसून पूर्णपणे कृतीयुक्त आहेत. सूर्यघड्याळ बनवणे, दुर्बिणीची रचना समजून घेणे, नकाशे वाचणे, विविध मॉडेल्स तयार करणे आणि प्रयोगांतून ग्रहांची गती अभ्यासणे यांमुळे शिक्षण अधिक जिवंत झाले आहे. शाळेच्या आवारातच रात्रीच्या वेळी छोटेखानी आकाशनिरीक्षण कार्यक्रम आयोजित करणे किंवा कागदी स्टार चार्टच्या मदतीने नक्षत्रे ओळखणे, अशा सोप्या उपक्रमांमुळे ‘कृतीतून शिक्षण’ या पद्धतीला मोठा वाव मिळतो आणि विज्ञानातील क्लिष्ट संकल्पना मुलांच्या मनात कायमच्या पक्क्या होतात.
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (एइपी) प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. याच धोरणाचा एक भाग म्हणून शाळांमध्ये ‘तारांगण सहल’ (प्लॅनेटेरियम व्हिजिट) हा उपक्रम राबवण्याचे मार्गदर्शक तत्त्व देण्यात आले आहे, जे अत्यंत स्तुत्य आहे. वर्गखोलीतील चार भिंतींच्या आणि फळ्यावरील चित्रांच्या पलीकडे जाऊन खगोलशास्त्र शिकण्यासाठी तारांगण हे सर्वोत्तम माध्यम आहे. तारांगणामध्ये आधुनिक डिजिटल प्रोजेक्टरच्या साहाय्याने आभासी आकाशाची निर्मिती केली जाते. तिथे ग्रहांचे भ्रमण, ताऱ्यांचे जीवनचक्र, नक्षत्रे, दीर्घिका आणि सूर्यग्रहण-चंद्रग्रहण यांसारख्या घटना डोळ्यांसमोर जिवंत होतात.
या पार्श्वभूमीवर, कोकणातील रत्नागिरी येथे उभारण्यात आलेले तारांगण ही या भागातील विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षणप्रेमींसाठी लाभलेली एक सुवर्णसंधी आणि मोठी पर्वणी आहे. रत्नागिरी आणि परिसरातील सर्व शाळांनी, संस्थांनी, शिक्षकांनी आणि पालकांनी या अत्याधुनिक तारांगण सुविधेचा आवर्जून लाभ घ्यायला हवा. स्थानिक शिक्षण विभाग, शाळा व्यवस्थापन आणि शिक्षकांनी पुढाकार घेऊन प्रत्येक विद्यार्थ्याला या तारांगणाचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल याचे नियोजन करायला हवे, ज्यामुळे कोकणातील शैक्षणिक पर्यटनालाही एक नवी दिशा मिळेल. अभ्यासक्रमातील खगोलीय धड्यांची सांगड जर रत्नागिरीच्या तारांगण सहलीशी घातली तर मुलांचे शिक्षण खऱ्या अर्थाने रंजक आणि अर्थपूर्ण होईल. सर्व शाळांनी आपल्या वार्षिक शैक्षणिक सहलींच्या आराखड्यात ‘रत्नागिरी तारांगण भेटीचा’ समावेश करावा आणि विद्यार्थ्यांना अंतराळ प्रवासाचा प्रत्यक्ष अनुभूतीदायक आनंद मिळवून द्यावा. शालेय अभ्यासक्रमातील खगोलशास्त्र आणि तारांगणाची ही अद्भुत सफर मिळून आपल्या राज्यातील मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवेल आणि भविष्यातील संशोधकांची नवी पिढी घडवेल, यात शंका नाही.
(लेखक खगोलविज्ञानाचे प्रसारक आहेत)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.