56237
तीव्र कुपोषित बालक चिकित्सा अभियान
आरोग्य विभागाचा उपक्रम; साईल यांच्या हस्ते सिंधुदुर्गनगरीत उद्घाटन
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ९ : महाराष्ट्र शासनाच्या कुपोषण निर्मूलन व संसर्गजन्य आजार नियंत्रण टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांच्या सूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीव्र कुपोषित बालकांसाठी जिल्हा रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्रात विशेष आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांच्या हस्ते शनिवारी (ता. ७) झाले.
आरोग्य सेवा आयुक्तालय, पुणे तसेच उपसंचालक आरोग्य सेवा, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरास जिल्हा परिषद आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती प्रीतेश राऊळ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. स्वप्नील मालखेडे, जिल्हा परिषद सदस्या दीपलक्ष्मी पडते यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबिरात बालरोग तज्ज्ञांकडून तीव्र कुपोषित बालकांची सखोल शारीरिक व आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आवश्यक प्रयोगशाळा चाचण्या, औषधोपचार तसेच इतर आवश्यक आरोग्य सेवा मोफत दिल्या जात आहेत. तपासणीमध्ये आजारी अथवा गंभीर स्थितीत आढळणाऱ्या बालकांना तातडीने पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करून तज्ज्ञांच्या देखरेखीखाली उपचार व विशेष आहार देण्यात येत आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या पथकांसह रुग्णवाहिकांच्या माध्यमातून बालकांना व त्यांच्या पालकांना शिबिरस्थळी आणण्यात आले. यासाठी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी समन्वय साधला. पालकांना बालकांच्या आहारातील पोषणाचे महत्त्व, योग्य आहार आणि बालसंगोपन याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून समुपदेशन करण्यात आले.
................
दोन टप्प्यांत शिबिर
शिबिराचा पहिला टप्पा शनिवारी (ता. ८) वैभववाडी, कणकवली, देवगड आणि मालवण तालुक्यांसाठी राबविण्यात आला. दुसरा टप्पा उद्या (ता. १०) कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांसाठी आयोजित केला आहे. जिल्ह्यातील सर्व तीव्र कुपोषित बालकांपर्यंत आवश्यक आरोग्य सेवा पोहोचवून त्यांच्यावर वेळेत उपचार करणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा कुपोषणमुक्त करण्याच्या उद्देशाने ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.