मालवण-कुडाळ रेल्वेस्टेशन बसफेरी बंद
प्रवाशांची गैरसोय; विद्यार्थी वर्गाला मोठा फटका
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १० : आगारातून नियमितपणे सुरू असलेली मालवण-धामापूर मार्गे कुडाळ रेल्वेस्टेशन ही सकाळची बसफेरी काही दिवसांपासून बंद ठेवल्याने या मार्गावरील प्रवासी व विद्यार्थी वर्गाला मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर या बसफेरीला चांगले भारमान मिळत असतानाही सेवा बंद ठेवल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
मालवण आगारातून रोज सकाळी १०.३० वाजता ही बस कुडाळ रेल्वेस्टेशनच्या दिशेने रवाना होते. धामापूरसह मार्गावरील विविध गावांतील प्रवाशांसाठी ही बसफेरी सोयीची ठरते. विशेषतः कुडाळ रेल्वेस्टेशन गाठण्यासाठी तसेच पुढील प्रवासासाठी अनेक प्रवासी या बससेवेवर अवलंबून असतात. मात्र, ही फेरी बंद असल्याने प्रवाशांना पर्यायी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.
कुडाळहून मालवणच्या दिशेनेही या बसची दुपारी १२ वाजताची परतीची फेरी नियमित होती. त्यामुळे सकाळी मालवणहून कुडाळकडे जाणारे आणि दुपारी कुडाळहून मालवणकडे परतणारे प्रवासी यांना या सेवेचा मोठा फायदा होत होता. रेल्वेने पुढील प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीही मालवण-कुडाळ रेल्वेस्टेशन जोडणारी ही बसफेरी महत्त्वाची मानली जाते.
या बसफेरीचा सर्वाधिक परिणाम विद्यार्थी व नियमित प्रवाशांवर होत आहे. महाविद्यालयीन कामकाज, शैक्षणिक कामे तसेच विविध कारणांसाठी कुडाळला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसफेरी बंद असल्याने वेळेचे नियोजन करणे अवघड झाले आहे. काही प्रवाशांना खासगी वाहनांचा किंवा इतर पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागत असल्याने अतिरिक्त आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे.
या मार्गावर नियमित प्रवाशांची संख्या मोठी असून बसफेरीला चांगले भारमान व उत्पन्न मिळत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत ही फेरी बंद ठेवण्यामागील नेमके कारण काय, असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे. आगार व्यवस्थापनाने प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी होत आहे.
----
बसफेरी पूर्ववत सुरू ठेवा!
मालवण-धामापूर-कुडाळ रेल्वेस्टेशन हा ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. या मार्गावरील नियमित बससेवा विस्कळीत झाल्यास त्याचा थेट परिणाम दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांसह विद्यार्थी, नोकरदार आणि रेल्वे प्रवाशांवर होतो. त्यामुळे मालवण आगाराने सकाळी १०.३० वाजताची मालवणहून कुडाळ रेल्वेस्टेशनकडे जाणारी तसेच कुडाळहून दुपारी १२ वाजताची परतीची बसफेरी तातडीने पूर्ववत करून नियमित सुरू ठेवावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.