शिवार्थ शेतकरी गट
फोंडाघाटमध्ये स्थापन
कणकवली ः पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धेच्या माध्यमातून आता ही केवळ स्पर्धा न राहता शेतकऱ्यांनी अनुभवांची देवाणघेवाण सामूहिक निर्णय घेऊन राबविलेले विविध उपक्रम युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन मास्टर ट्रेनर अॅड. रवींद्र पोभणे यांनी केले. फोंडाघाट येथील युवा शेतकरी विश्वास जोईल व अक्षय परब यांनी शिवार्थ शेतकरी गटाची स्थापना करून पाणी फाउंडेशन फार्मर कप स्पर्धेत सहभाग घेतला आहे. या अनुषंगाने पाणी फाउंडेशनचे समन्वयक त्यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी केलेल्या शेतीच्या पाहणी दरम्यान श्री. पोभणे बोलत होते. पाणी फाउंडेशन फार्मर कपची सुरुवात २०२२-२३ पासून झाली असून राज्यातील ४६ तालुक्यात त्याची अंमलबजावणी होत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून सर्व महाराष्ट्रात २०२६-२७ पासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी गटातील सर्व सदस्य तसेच मंडळ कृषी अधिकारी दुर्वा झुलपे, उपकृषी अधिकारी देवेंद्र कांबळे, उपकृषी अधिकारी मानसी वेर्लेकर, अक्षया परब उपस्थित होते.
---
झोळंबेसह परिसरात
‘आरोग्य’चे ‘तीनतेरा’
ओटवणे ः झोळंबे परिसरात सध्या तापसरीची साथ पसरत असून आजारी रुग्ण आढळून येत आहेत. या साथीवर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी तळकट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि त्याअंतर्गत येणार्या उपकेंद्रांमधील रिक्त असलेली डॉक्टर, आरोग्य सेवक व आरोग्य सेविकांची पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी या भागातून आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापाची साथ डोके वर काढत आहे. मात्र, रुग्णांवर वेळेवर उपचार करण्यासाठी स्थानिक पातळीवर पुरेशी वैद्यकीय यंत्रणा उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहेत. तळकट प्राथमिक आरोग्य केंद्रावर आजूबाजूच्या अनेक गावांची मदार आहे. परंतु, या केंद्रासह त्या अंतर्गत उपकेंद्रातील महत्त्वाची पदे अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत. आरोग्य उपकेंद्रात पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध नसल्याने रुग्णांना तातडीने उपचार मिळत नाहीत. आरोग्य सेवक व आरोग्य सेविकांच्या रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा विलंबाने मिळत आहे. किरकोळ तापाच्या उपचारासाठीही रुग्णांना दूरवरच्या खासगी रुग्णालयात आर्थिक भुर्दंड सहन करत जावे लागत आहे.
---
वैभववाडी-विजयदुर्ग
बस फेरी पूर्ववत करा
वैभववाडी ः वैभववाडी बसस्थानकावरून सुटणारी विजयदुर्ग-पाचल बससेवा पूर्ववत सुरू करावी. ही बससेवा बंद असल्यामुळे भुईबावडा-जांभवडे परिसरातील विद्यार्थी व नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. बससेवा पूर्ववत सुरू न झाल्यास खासगी गाड्यांमधून प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा इशारा देऊ, अशी संतप्त प्रतिक्रिया पंचायत समिती सदस्य देवानंद पालांडे यांनी पंचायत समिती सभागृहात व्यक्त केली. वैभववाडी पंचायत समितीची मासिक सभा सभापती सिद्धेश रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपसभापती साची कोलते, सदस्य देवानंद पालांडे, मंगेश लोके, सुवर्ण संसारे, साधना नकाशे, गटविकास अधिकारी प्रिमेश वाघ आदी उपस्थित होते. विजयदुर्ग-पाचल बससेवा बंद असल्यामुळे या भागातील विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. शालेय विद्यार्थ्यांनी प्रवास कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला असून ही बससेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली.
........................
क्षेत्रपालेश्वर मंदिरामध्ये
विविध धार्मिक कार्यक्रम
सावंतवाडी ः श्रावण महिन्यानिमित्त श्री देव क्षेत्रपालेश्वर-सातेरी मंदिर, होडावडा येथे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात ३१ ऑगस्टला सायंकाळी ७ वाजता सदाशिव पाटील यांचे कीर्तन होणार आहे. हार्मोनियम-गजानन मेस्त्री, तबला-अक्षय सरवणकर साथ करणार आहेत. रात्री ८ वाजता ग्रामस्थांची भजने तसेच ७ सप्टेंबरला मंदिरात सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, सायंकाळी ग्रामस्थांची भजने होणार आहेत. श्रावण महिन्यातील या धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहून दर्शन, तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव क्षेत्रपालेश्वर देवस्थानचे मानकरी, देवसेवक व ग्रामस्थ यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.