56664
देवरूख शहर अजूनही
‘तिसऱ्या डोळ्या’च्या प्रतीक्षेत
निविदा प्रक्रिया सुरू ; महिनाभरात बसणार सीसीटिव्ही
देवरूख, ता. ११ ः शहरातील वाढती वर्दळ, वाहतूक व्यवस्था आणि सुरक्षेच्यादृष्टीने महत्त्वाचे ठरणारे सीसीटीव्ही कॅमेरे अद्याप शहरात कुठेही बसवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे देवरूख शहर सध्या ‘तिसऱ्या डोळ्या’च्या नजरेपासून दूर असल्याचे चित्र आहे. चोरी, अपघात, वाहतूककोंडी तसेच अन्य अनुचित प्रकार घडल्यास त्याची दृश्य नोंद उपलब्ध होण्यास अडचणी येत आहेत.
देवरूख शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठ, गर्दीची ठिकाणे आणि महत्त्वाच्या मार्गांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे; मात्र, अद्याप प्रत्यक्ष कॅमेरे बसवण्याचे काम सुरू झालेले नाही.
दरम्यान, नगरपंचायतीने शहरातील प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याच्यादृष्टीने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या महिनाभरात चौकाचौकात कॅमेरे बसवण्याचे नियोजन असल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाने दिली आहे. देवरूख शहरातील सुरक्षेच्यादृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा अत्यावश्यक बनली आहे. प्रशासनाने महिनाभरात कॅमेरे बसवण्याचे आश्वासन दिल्याने आता प्रत्यक्ष कामाला सुरवात कधी होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
-------
कोट 1
शहरातील सुरक्षेच्यादृष्टीने प्रमुख चौक आणि आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येत असून, ती पूर्ण झाल्यानंतर महिनाभरात शहरातील प्रमुख चौकांमध्ये कॅमेरे बसवण्यात येतील.
- प्रशांत भोसले, मुख्याधिकारी, देवरूख नगरपंचायत
चौकट
येथे बसवणार सीसीटीव्ही कॅमेरे
छत्रपती शिवाजी महाराज चौक, प्रतापसूर्य बाजीराव पेशवे उद्यान (केशवसृष्टी), मारूती मंदिर, पोलिस ठाणे, स्वा. सावरकर चौक, देवरूख मच्छीमार्केट, मैत्री पेट्रोलपंप, कांजिवरा नाका, लोध विहीर परशुरामवाडी रस्ता, मार्लेश्वर तिठा, वरचीआळी नाका, ओनेस्ट हॉटेल, हायस्कूलजवळील खाके कॉर्नर, देवरूख नगरपंचायत कार्यालयासमोरील मातृमंदिर चौक आणि माणिक चौक.